पुणे : मैत्री चित्रकला फौंडेशनतर्फे येथील बालगंधर्व कलादालनात आज हास्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर हे होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य शिवारचे संपादक जयराम देसाई, प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडीत तसेच वैजनाथ दुलंगे, गणेश उर्फ सारंग दिवेकर, गौतम दिवार आदी उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, शब्दात व्यक्त करता येत नाही ते कुंचल्याच्या एका फटकाऱ्यातून सांगण्याची ताकद व्यंगचित्रकाराकडे असते. हास्य चित्रातून व्यंगचित्रकार जगण्याची हसत-खेळत उलटतपासणी करतात. जोशी पुढे म्हणाले, सध्या टीका करणारी व्यंगचित्रे सहन होत नाहीत, सगळ्यानांच फक्त कौतुकाची सवय लागली आहे, कलाकाराची कला निर्णय शासन घेऊ लागते किंवा झुंडी येऊ लागतात तेव्हा कलेचे अधःपतन सुरु होते, विनोदबुद्धी क्षीण होणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. वैजनाथ दुलंगे, गौतम दिवार आणि गणेश उर्फ सारंग दिवेकर यांची व्यंगचित्रे रंजन करतानाच डोळ्यात अंजन घालणारी आहेत. व्यंगचित्रकरांची पुढची पिढी समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेत आहे हि समाधानाची बाब आहे.
अनिल उपळेकर, चारुहास पंडीत यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख,ग्राफिक डिझायनर शाम वायचळ, प्रथमेश पाटील, श्रीकांत तिकोने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.
सदरचे प्रदर्शन या ठिकाणी दोन मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.