पुणेः- कवींनी कोणत्याही ईझमच्या आहारी न जाता समाजातील सामाजिक राजकीय विषमतेवर त्रयस्तपणे भाष्य करणे अपेक्षित असते. आपण ज्या समाजात राहतो त्याच समाजाचे उत्तरदायीत्व आपण जपले पाहिजे, असे मत महाराष्ट्राचे लाडके वात्रटिकाकार रामदास फुटाणे उर्फ नाना यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कोथरुड शाखा आणि महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लाडके वात्रटिकाकार रामदास फुटाणे उर्फ नाना यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताच्या पूर्वसंध्येला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अभिष्टिंचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या अभिष्टिंचिंतन सोहळ्याला उत्तर देतांना वात्रटिकाकार रामदास फुटाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी.डी.पाटील उपस्थित होते. तसेच यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रकाश मगदुम, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, उद्योगपती भारत देसडला, कवी अरुण शेवते,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कोथरुड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पिंपरी येथील 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन ईटकर, महाराष्ट्र कला प्रसारिणी सभेचे उद्धव कानडे, संजय ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिष्टिंचिंतन सोहळ्याला उत्तर देतांना वात्रटिकाकार रामदास फुटाणे त्यांच्या मनोगतात म्हणाले, सभोवतालचे वातावरण पाहिले असता मुलत्त्ववाद्यांची चळवळ पुन्हा वर डोके काढते की काय अशी परिस्थिती आणि दहशत जाणवते. कवी, साहित्यीक, सिने-नाट्य कलाकारांनी समाजाचे आपण काही देणे लागतो याचे भान ठेऊन नागरीकांच्या थेट प्रश्र्नाला हात घातला पाहिजे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर आणि अमिर खान यांनी पाणी ही नागरीकांशी रोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्र्नाला ज्या प्रकारे हात घातला हे केवळ स्वागतार्हच नव्हे तर अनुकरणीय आहे. अमृतमहोत्सवी वर्षाचा संकल्प म्हणुन मी देखील मराठवाडा, विर्दभ दाैरे काढून त्याभागातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. पूर्वी गरीबी होती पंरतू नागरीक पर्याय शोधायचे पंरतू 1990 नंतर शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेलं आत्महत्येचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.
सामना नंतर चित्रपट क्षेत्रा एवजी कवीता या साहित्यप्रकाराकडे वळण्यामागे देखील पैसा हे कारण होते. कारण चित्रपटापेक्षा कवीतेला आर्थिक गुंतवणूक फार थोडी लागते. महाराष्ट्रीयन जनता भावूक, भावीक आणि धार्मिक आहे. त्यामुळे आपण निदान ज्यांच्यानावाने डोक्यावर पगडी घालतो त्यांच्या विचारांचा आदर अाणि अनुकरण केले पाहिजे. माझ्या खिशात पैश्यांची नेहमी चणचण असायची पंरतू माझ्या कवीतेच्या प्रतिभेवर माझ्या श्रीमंत आणि दिलदाल मित्रांचा विश्वास होता. ज्या सामना चित्रपटाने मला ओळख प्राप्त करुन दिली त्याच्या खऱ्या यशाचे शिलेदार हे विजय तेंडुलकर हे आहेत. त्यांनी चित्रपटाची कथा दमदार लिहिल्याने आणि त्याला जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्गजाचे दिग्दर्शन लाभल्याने तो चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवा पर्यंत पोहचू शकला. कवीता हा साहित्यप्रकार निवडतांना देखील पान, फुलांवर मला कवीता करायच्या नव्हत्या. काहीतरी वेगळे लिहायचे याची खुनगाठ मनाशी होतीच, म्हणुनच मी राजकारणातील विषमतेवर भाष्य करण्यास सुरुवात केली. माझे साहित्य किती कसदार आहे हा येणारा काळच ठरवेल. माझ्या मृत्यूनंतरही शंभर वर्षांनंतर माझे साहित्य समकालीन राहिले आणि ते वाचले गेले तरच मी साहित्यीक म्हणुन यशस्वी झालो असे म्हणेन.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, फुटाणे यांनी कवी असुन स्वतःची वात्रटिकाकार म्हणुन जी वेगळी ओळक निर्माण केली ते काैतुकास्पद आहे. जामखेड सारख्या दुष्काळी ,खेडेगावांतून आलेल्या फुटाणे यांनी राजकीय घटनांवर भाष्य करुन अनेकांच्या डोळ्यात अंजन घातले. जगण्यातली विषमता टिपत त्यांनी कमीतकमी शब्दात जगण्यातील दाहक वास्तव मांडले. त्यांची नेहमी काहितरी नवीन शोधण्याच्या प्रवृत्ती मुळे खेड्यापाड्यांवरील अनेक नवकवींना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. त्यांचे गरीबांकरता मन नेहमी कळवळते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, उद्योगपती भारत देसडला, कवी अरुण शेवते आदींनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. तर सुत्रसंचलन उद्धव कानडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिन ईटकर यांनी मानले. अभिष्टिंचिंतन सोहळ्यानंतर रामदास फुटाणे निर्मित सामना हा मराठी चित्रपट दाखविण्यात आला.