पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी परस्परांतील वाद संपवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती करावी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर एकत्रित बसून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असा फाॅर्म्युला भाजप आणि शिवसेनेला सुचविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच आपण स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पुणे शहर यांच्या वतीने रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन विश्रामग्रहात केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे कोषाध्यक्ष एम डी शेवाळे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी,चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, आयुब शेख, महेश शिंदे, महिपाल वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास सेना ही जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास आहे. सध्या येथे शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत. त्यांना तुम्ही दुसरीकडे उमेदवारी द्या, आमदारकी द्या किंवा मंत्री करा, पण माझ्यासाठी ही जागा सोडा असे मी सांगणार आहे. त्याचबरोबर साताऱ्याची जागाही रिपाइंसाठी सोडावी. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू. याबाबत उदयनराजेंशी बोलणार होतो. मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही.”
भाजपचे चाळीस आमदार आणि सहा खासदार डेंजर झोनमध्ये असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता आठवले म्हणाले, “त्या डेंजर झोनमधील मतदारसंघ सुरक्षित करण्याची जबाबदारी माझी असेल. बाळासाहेब आंबडेकर आणि एमआयएम यांच्या युतीची भीती नाही. कारण यांच्यापेक्षा अनेक पटीने माझ्या सभांना गर्दी होते. आंबेडकरांना टाळी देण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. मात्र त्यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद येत नाही. आबा बागुल चांगले काम करीत असून गेली ३० वर्षे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळायला हवी.” तिकडे उमेदवारी मिळत नसेल, तर इकडे असे आमंत्रणही आठवले यांनी दिले.”गावात मराठ्यांचे दोन गट असतात. त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा कायदा चुकीचा वाटतो. त्यामुळे दलितांनी दुसऱ्यांचे ऐकून असे गुन्हे दाखल करू नयेत. मराठा समाज्याच्या मोर्च्यांची चर्चा जगभर झाली. मात्र आता ते आंदोलन हिंसक होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. मी गेली २५ वर्षे मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. तसेच आगामी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार आहे.” असेही आठवले यांनी नमूद केले.
दोषींवर कारवाई व्हावी
सध्या देशभरात उठलेल्या ‘मीटू’च्या मोहिमेबाबत बोलताना आठवले म्हणाले, “मिटूबाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर, एम जे अकबर आणि इतर आरोप झालेले जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझा संबंध ‘मीटू’शी नाही, तर युट्यूबशी असल्याचे त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत सांगितले.