- पुलवामा दहशतवादाचा निषेध नोंदवण्यासाठी दादरमधीलव्यापाऱ्यांची एकजूट!
- शाहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी ‘दादर व्यापारी संगठनेची भरीव मदत!
- सर्व रक्कम एकत्रीत करून मुख्यमंत्र्यांकड़े सुपूर्द करणार!
- कोणतेही पाकिस्तानी उत्पादन न विकण्याचा संगठनेचा निर्णय!
- दादर व्यापारी संघटनेने अर्धा दिवस दुकाने बंद करून वाहिलीजवानांना श्रद्धांजली!
- भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी दादर व्यापारीएकजूटीचा ‘लॉंग मार्च‘
मुंबई-पुलवामा दहशतवादाचा निषेध नोंदवण्यासाठी काल दादरमधील सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत प्रचंड लॉंग मार्च काढून देशासाठी कायम बलिदान देणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. जनता या शूरवीरांचं बलिदान कदापी विसरणार नाही. आमच्या सर्व संगठना या जवानांच्या कुटुबीयांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहतील. त्यासाठी आमच्या संगठनांनी ठोस पाऊले उचलून निधी गोळा करायला सुरुवात केली असून व्यापारी वर्ग स्वतःहून पुढाकार घेत आहे. हा हल्ला करणाऱ्या पाकिस्तानातील संघटनांचा आम्ही तीव्र निषेध करतोय, यापुढे पाकिस्तानातील एकही वस्तू आमचे व्यापारी विकणार नाहीत, असे संघटनेच्या वतीने महेश पांडुरंग वैद्य, आनंद जगन्नाथ पेडणेकर, दीपक देवरुखकर, श्रीराम पाध्ये, सुनील शहा, संतोष भडेकर,भैरव शहा, राजेश छेडा यांनी व्यक्त करीत या हल्ल्यात प्राण गमावून शाहिद झालेल्या भारताच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्राची खरी श्रीमंती म्हणजे त्याचे सैन्य, आणि या सैन्यावर जेव्हा असे भ्याड हल्ले होतात आणि आपले बहादूर जवान शाहिद होतात तेव्हा देश शोक सागरात बुडून हळहळ व्यक्त करतो आणि देशासाठी एकजुटीने आपल्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पाकिस्तानी अतिरेकी संघटनेने भ्याड हल्ला करून भारत मातेच्या ४४ शूर वीर पुत्रांचं घेतेलेलं बलिदान हे प्रत्येक भारतीयाच्या मनात सलत असून प्रत्येकात चीड निर्माण करीत आहे. या हल्याचा सर्वत्र तीव्र निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर दादर येथील सर्व व्यापारी बांधवांनी आपली एकजूट दाखवीत काल त्यांची सर्व दुकाने बंद करून शत्रू राष्ट्राचा आणि दहशतवादाचा धिक्कार करीत प्रचंड लॉंग मार्च काढून निषेध नोंदवला. तसेच पाकिस्तानमधील एकही वस्तू यापुढे आम्ही विकणार नाहीत असा पवित्रा जाहीर केला. या मोर्चामध्ये जवळपास २५०० हून अधिक व्यापारी – कर्मचारी सामील झाले होते. यामध्ये ‘दादर व्यापारी संघ’, ‘उपनगरीय सराफी संघटना’, ‘सुवर्णकार कारागीर संघटना’, ‘मराठी व्यवसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ’, ‘दादर मेटल मर्चंट असोसिएशन’, ‘दादर हॉटेल संघटना’, ‘दादर धान्य व्यापारी संघटना’, ‘दादर फेरीवाले संघटनानी’ महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या सर्व संघटनांनी शाहिद जवानांच्या कुटुंबियांकरिता मदत म्हणून ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यक निधी’साठी कमीत कमी १००० रुपये पासून जास्तीतजास्त भरगोस मदत, दोन दिवसांच्या आत करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने महेश पांडुरंग वैद्य, आनंद जगन्नाथ पेडणेकर, दीपक देवरुखकर, श्रीराम पाध्ये, सुनील शहा, संतोष भडेकर,भैरव शहा, राजेश छेडा यांनी केली. त्यासाठी “दादर व्यापारी संघ” या नावे धनादेश गोळा करून लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहेत.