पुणे-युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे असे भाजपाचे राजेश पांडे यांनी म्हटले आहे . महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राज्य सल्लागार समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आलीय. या समितीत अशासकीय सदस्य म्हणून पांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानून ते म्हणाले ,’राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतील एनएसएसचे कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे, म्हणून ही समिती काम करत असते. दर तीन वर्षांनी या समितीची पुनर्रचना करण्यात येते. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंसह एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश असतो. समितीत अशासकीय सदस्य म्हणून माझ्यासोबत राज्याचे माजी संपर्क अधिकारी डॉ.प्रमोद पाब्रेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सहायक प्रा. डॉ. सतीश लोकपाल चापले यांचाही समावेश आहे.
पांडे पुढे असे म्हणाले कि,’या समितीच्या सदस्यपदी झालेली निवड म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून मी केलेल्या कामाची पावती आहे, असे मी मानतो. गेल्या ४० वर्षातील विद्यार्थी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि युवकांसंदर्भातील कामाचा आणि सेवेचा अनुभव या समितीच्या माध्यमातून उपयोगात आणून केलेली निवड सार्थ ठरवेन, याबद्दल मला विश्वास आहे.तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्कीच केला जाईल, याची सर्व समिती सदस्यांच्यावतीने ग्वाही देतो.

