पुणे – नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यंगचित्र स्पर्धेत राजेंद्र सरग यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘अनकॉमन आत्मा टू महात्मा’आणि ‘सामाजिक जागृती’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेसाठी 18 देशातील 30 व्यंगचित्रकारांसह भारतातील व्यंगचित्रकारांनीही सहभाग नोंदवला होता. त्यातील निवडक 360 व्यंगचित्रांचे प्रदर्शन नुकतेच नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.
विदर्भ कार्टूनिस्ट्स असोसिएशन, जेनेसिस फाऊंडेशन आणि लालित्य फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन उषा लक्ष्मण यांच्या हस्ते तर सुप्रसिध्द व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजेंद्र सरग यांच्या यशाबद्दल राधिका बुटी, प्रसाद पिंप्रीकर, उमेश चारोळे, संजय मोरे, लहू काळे, योगेंद्र भगत, महेंद्र भावसार, विश्वास सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे. राजेंद्र सरग हे 1987 पासून व्यंगचित्रक्षेत्रात कार्यरत असून त्यांना व्यंगचित्राचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.


