आठव्या राजा परांजपे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आशुतोष गोवारीकर, मेधा मांजरेकर, महेश काळे , जोशी यांचा सन्मान
पुणे – राजा परांजपेंच्या चित्रपटांचे आपण लहानपणापासूनचे चाहते असून राजाभाऊंच्या नावानेच मराठी चित्रपटसृष्टीची ओळख असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हिंदी व मराठी अभिनेते मोहन आगाशे यांनी केले. ते आठव्या राजा परांजपे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता जितेंद्र जोशी, मेधा मांजरेकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायक महेश काळे यांचा सन्मान मोहन आगाशेे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सर्व मानकऱ्यांची मुलाखत घेतली. याप्रसंगी राजा परांंजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे व ट्रस्टी अजय राणे हे उपस्थित होते.
राजा परांजपे यांच्या स्मृती मराठी मनात वर्षानुवर्षे टिकून आहेत. त्यांचा कार्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. तसेच राजा भाऊंची २० एप्रिल रोजी जयंती असते. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून १४ ते २० एप्रिल या दरम्यान दरवर्षी हा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा आनंद पुणेकर रसिकांना विनामूल्य लुटता येणार आहे.पण सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेशिका आवश्यक असून आयोजकांच्या वतीने ह्या प्रवेशिका दिल्या गेल्या आहेत. यादरम्यान राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट, हा माझा मार्ग एकला, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, गंगेत घोडं न्हालं पुढचं पाउल व जगाच्या पाठीवर हे गाजलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याचसोबत इतर चित्रपट, नाटके व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळेल.





