जगदीश कुंटे – अंतर्मुख करणारे स्‍वतंत्र शैलीचे व्‍यंगचित्रकार

Date:

बेळगावातील मराठी व्‍यंगचित्रकार म्‍हणून जगदीश कुंटे यांची ओळख आहे. चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण नसतांनाही महान व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्‍मण यांच्‍यासारख्‍या तसेच लहान-मोठ्या व्‍यंगचित्रकारांची चित्रे पहात, त्‍यांचा अभ्‍यास करुन स्‍वत:ची स्‍वतंत्र व्‍यंगचित्रशैली कुंटे यांनी निर्माण केली. व्यंगचित्रातील पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि चपखल शब्‍द योजना यामुळे त्‍यांची व्‍यंगचित्रे वाचकांना वेगळा आनंद देऊन जातात. त्यांचे निरीक्षण, आकलन, भाष्य-क्षमता, विसंगती शोधण्याची ‘व्यंगदृष्टी’ उच्‍च दर्जाची आहे.

जगदीश कुंटे यांचे वडील शिक्षक होते. त्‍यांना साहित्‍य, संगीत, नाट्य यांची आवड होती. त्‍यांच्‍या वडिलांनी तीन अंकी नाटकेही लिहीलेली होती. घरांतील साहित्यिक, सांस्‍कृतिक वातावरणाचा सकारात्‍मक परिणाम जगदीश कुंटे यांच्‍यावर झाला.

दहावीत असतांना जगदीश कुंटे यांनी स्‍नेहमंडळाच्‍या ग्रंथालयात ग्रंथपाल म्‍हणून काम सुरु केले. या कामामुळे आर्थिक फायदा आणि वाचनाचा फायदा त्‍यांना झाला. मार्मिक, रसरंग, किर्लोस्‍कर, स्‍त्री, मनोहर, मराठा, महाराष्‍ट्र टाइम्‍स, स्‍वराज्‍य अशा वृत्‍तपत्रे, नियतकालिकांमुळे त्‍यांचे वाचनविश्‍व समृध्‍द होत गेले. ग्रंथपाल म्‍हणून नोकरी आणि महाविद्यालयीन शिक्षण हे दोन्‍ही एकाचवेळी चालू होते. मार्मिकमधील बाळासाहेब ठाकरे यांची आणि महाराष्‍ट्र टाइम्‍समधील आर.के. लक्ष्‍मण यांची चित्रे पाहून आपणही व्‍यंगचित्रे रेखाटावी, असे त्‍यांना वाटले. प्राध्‍यापक वर्गात येण्‍यापूर्वी फळ्यावर ते आपली व्‍यंगचित्रकला सादर करायचे. प्राध्‍यापक आणि वर्गमित्रांचे त्‍यांना नेहमीच प्रोत्‍साहन मिळत होते. लेखक रॉय किणीकर हे कुंटे यांच्‍या घरी यायचे. त्‍यांनी चित्रे पाहून अधिक चांगली डेव्‍हलप कर, असा सल्‍ला दिला. नाटककार न.ग. कमतनूरकर आणि त्‍यांच्‍या पत्‍नी सरोजिनी कमतनूरकर यांचे त्‍यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयात असतांना जगदीश कुंटे यांनी रेखाटलेले पहिले व्यंगचित्र 1979 साली ‘मार्मिक’ मध्ये प्रसिध्द झाले.  त्यानंतर जत्रा, नवप्रभा, तरुणभारत, पुढारी, इंडियन एक्सप्रेस, जनतावाणी, न्‍यूजलिंक अशा अनेक नियतकालिकांतून असंख्य व्यंगचित्रे प्रसिध्द झाली. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ बेळगाव तरुण भारतसाठी ‘रेशमी चिमटे’ या सदराखाली नियमितपणे व्‍यंगचित्रे काढत आहेत. या सदरातील निवडक व्‍यंगचित्रांचे ‘रेशमी चिमटे’ हे पुस्‍तक आणि ‘तरुण भारत’च्या ‘अक्षरयात्रा’ या रविवारच्‍या पुरवणीतील सामाजिक व्यंगचित्रांचे ‘अक्षरहास्य’ हे पुस्‍तक प्रसिध्द झाले आहे. या पुस्तकाला वाङमय चर्चा मंडळाचा विशेष पुरस्कार तसेच मधुसूदन गोखले विनोदी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकातील ‘जनतावाणी’ या कन्नड दैनिकातही त्‍यांची व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. ‘व्यंगचित्रे- एक बोलकी कला’ या विषयावर ते प्रात्यक्षिकासह व्याख्यान देतात.

शिक्षक, सेल्समन आणि व्यवस्थापक अशा विविध भूमिका बजावत असतानाच व्यंगचित्रकाराची वठवलेली भूमिका सर्वात आवडीची असल्‍याचे ते प्रामाणिकपणे सांगतात. ब्रुक बॉण्‍ड कंपनीमध्‍ये ते सुमारे 24 वर्षे कार्यरत होते. तिथून स्‍वेच्‍छानिवृत्‍ती घेवून ते बेळगाव तरुण भारतमध्‍ये प्रशासकीय व्‍यवस्‍थापक व कार्टूनिस्‍ट या पदावर रुजू झाले.

बेळगाव तरुण भारतसाठी दैनंदिन व्‍यंगचित्रे रेखाटण्‍याच्‍या अनुभवाबाबत ते म्‍हणतात,  ‘वृत्तपत्रातील चित्रे ताज्या घडामोडींवर भाष्य करणारी असतात. त्यामुळे ती वाचकांना भावतात पण ती लवकरच कालबाह्यही ठरतात. रोजच्या रोज नवी कल्पना घेऊन व्यंगचित्र काढणं वाटतं तितकं सोपं नाही. कल्पना सुचेपर्यंत अस्वस्थ स्थिती असते आणि चित्र पूर्ण होताच दुसऱ्या दिवशीचा विचार डोक्यात  सुरु होतो. रोजच्या रोज आपल्यासमोर असंख्य विषय येतात पण त्यांची माती व्यंगचित्र तयार होण्यासाठी सुयोग्य असेलच असे नाही. यासाठी विषयाची निवड महत्‍त्‍वाची ठरते. विषय निश्चित झाल्यावर नेमक्या रेषात-भाषेत आपला विचार वाचकापर्यंत पोचवायचा असतो. व्‍यंगचित्र पाहिल्‍यानंतर वाचकांची मिळणारी प्रतिक्रिया आनंद व कष्‍टाचं चीज झाल्‍याचं समाधान देऊन जाते’.

जगदीश कुंटे यांच्‍या व्‍यंगचित्रांबाबत ज्‍येष्‍ठ पत्रकार कुमार केतकर म्‍हणतात, ‘व्यंगचित्र हे एक भाष्य असते. कित्येकदा एक हजार शब्दांच्या लेखात वा अग्रलेखात जे भाष्य चपखलपणे केले जाऊ शकत नाही, ते व्यंगचित्रातून साध्य होऊ शकते. म्हणजेच फक्त कुंचला कौशल्य असून चालत नाही तर दृष्टिकोनही हवा. तो दृष्टिकोन असा हवा की ज्यामुळे समाजातील विसंगतीकडे निर्देश करताना वाचक अंतर्मुखही व्हायला हवा. जगदीश कुंटेंच्या व्यंगचित्रांमधून नेमका तो परिणाम साधला जातो’.

जगदीश कुंटे यांच्‍या एका व्‍यंगचित्राविषयी ते लिहीतात. एक महिला आश्चर्य व उद्वेगाने  नळावर पाणी भरायला आलेल्या पुरुषाला उद्देशून म्हणते की, “तुमच्याकडे ड्रेनेजमिश्रित पाणी येतं?….. नशिबवान आहात. आमच्याकडे तेही येत नाही.” हे भाष्य राजकारणावरचे नाही वा कोणा राजकीय व्यक्तीवरचेही नाही. बेबंद वाढणाऱ्या लहान-मोठया शहरांमधील नागरी समस्या किती भीषण झाल्या आहेत, त्याकडे हे व्यंगचित्र लक्ष वेधते. म्हटले तर त्यात कारुण्य आहे, म्हणूनच हसतानाही आपण विषण्ण होतो.

अस्सल व्यंगचित्राला वा विनोदाला कारुण्याचा स्पर्श असतोच. चार्ली चॅप्लीन असो वा लॉरेल हार्डी, त्यांनी चित्रपट माध्यमातून मांडले ते समाजातील व्यंग होते किंवा व्यक्तिमत्वातील अंतर्विरोध होता वा परिस्थितीजन्य असहायता होती. परंतू चित्रपट या माध्यमातून मोठा पट घेता येतो. व्यंगचित्रकाराला ती सुविधा नसते. एकाच तडाख्यात स्थिती आणि भाष्य व्यक्त करायचे असते. कुंटे यांच्या व्यंगचित्रांचे हे वैशिष्टय आहे. ते असा विरोधाभास दाखवून देतात. परंतु अर्थातच त्यांची तितकीच खासियत आहे ती राजकीय व्यंगचित्रांची. त्यांच्या राजकीय व्यंगचित्रांमधून ते राजकारणातील ढोंगबाजीवर, पुढाऱ्यांच्या पोकळ वल्गनांवर, निर्लज्जपणावर आणि निगरगट्टपणावर प्रखर प्रकाशझोत टाकतात. कुंटेंच्या चित्रांमधील नेमके, खटयाळ, चलाख भाष्य हे त्यांचे सामर्थ्य आहे. त्यांचे निरीक्षण, आकलन, भाष्य-क्षमता आणि अर्थातच विसंगती शोधण्याची ‘व्यंगदृष्टी’ वरच्या दर्जाची आहे.

-राजेंद्र सरग

9423245456

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...