“वृद्धत्व एक न एक दिवस सर्वांनाच येणार आहे. लहानपण ज्ञानार्जनासाठी, तरूणपण धनार्जनासाठी आणि वृद्धत्व पुण्यार्जनासाठी असते. मात्र काही जण वृद्ध झालो आहोत या विचारानेच जगण्यातील उत्साह गमावून बसतात. वृद्धापकाळात आपण काहीच करू शकत नाही, असा विचार करणे चूकीचे आहे. वृद्धत्व तर जीवनातील सोनेरी अध्याय असतो. या काळातदेखील तुम्ही अधिक चांगले काम करू शकता. व्यक्ती वयाने नव्हे, तर विचाराने वृद्ध होतो. वय कितीही असो आयुष्य उत्साहाने, आनंदाने, सन्मानाने जगावे,” असा संदेश मुनिश्री प. पु. १०८ पुलकसागर महाराज यांनी गुरूवारी दिला. अनेकदा वय वाढते त्यानुसार भिती, अविश्वासही देखील वाढतो. त्यातुन लहानांवर निर्बंध लावण्याचे, त्यांची हेटाळणी करण्याचे प्रकार मोठ्यांकडून घडतात. तुमच्या अशा व्यवहारामुळेच मुले तुमच्या जवळ येण्यापेक्षा, तुम्हाला टाळण्याचे प्रयत्न होतात. मुलांना त्यांच्या मनाप्रमाने निर्णय घेण्याची मोकळीक वृद्धपकाळात आपण दिली पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. व्यवहारांमधील लुडबुड कमी करावी, असेही मुनिश्री यांनी सांगितले.
सकल जैन वर्षायोग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे सुरू आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे बारावे पुष्प गुंफतांना ‘वृद्धापकाळी कसे जगावे’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, उत्कर्ष गांधी, आदी मंचावर उपस्थित होते. तसेच पुण्याच्या माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी, सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. एन.नवले, सुर्यदत्ता इन्स्टिट्युटचे संचालक संजय चोरडिया, जैन बंधुता संमेलनाचे अध्यक्ष अशोक पगारिया, जैन महिला जागृती मंचच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निम्मी जैन यांनी याप्रसंगी उपस्थित राहुन मुनिश्रींच्या प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीकांत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. त्यानंतर पिंपरी येथील एकता ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतल्या नंतर माजी आमदार दीप्ती चौधरी म्हणाल्या, “हल्लीच्या धकाधकीच्या, अशांत जीवनात अध्यात्मिक विचारांचे महत्व वाढले आहे. आजची पिढी ही सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी धडपडत असते. प्रसंगी ती भरकटतही असते. अशा पिढीसाठी मुनिश्री हे योग्य मार्ग दाखविणारे दीपस्तंभ आहेत. मुनिश्रींची मधूर वाणी, मौलिक विचार, नागरिकांना प्रेरणादायी आहेत. पुणेकरांना त्यांचे विचार ऐकावयास मिळत आहेत, ही एक आनंदाची बाब आहे. कै. रसिकलाल धारिवाल यांनी समाजासाठी सदैव मोठे योगदान दिले, त्यांचे नाव चार्तुमास मंडपास देऊन त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले. ही समाधानाची बाब आहे” असे त्या म्हणाल्या.
सिंहगड संस्थेचे अध्यक्ष एम.एन नवले म्हणाले, शालेय शिक्षण जैन शाळेमध्ये झाले आहे. त्यामुळे लहानपणापासून जैन समाजातील उत्सव पाहत आलो आहे. विशेषत: चातुर्मास काळात जेव्हा गुरू महाराज येत त्यांचे आशीर्वाद आवर्जून घेत असत. आजही मी आवर्जून चातुर्मास कार्यक्रमात महाराजांचे दर्शन घेत असतो. या चातुर्मासानिमित्त मुनिश्रींना ऐकायची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”
यावेळी मुनिश्रींचे पाद्प्रक्षालन करण्यात आले. उपस्थित मान्यवर पाहुण्यांना मुनिश्रींनी पुस्तके भेट दिली. प्रवचनास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.