पुणे-यश हा प्रत्येक व्यक्तीचा कर्मसिद्ध अधिकार आहे. यश केवळ मेहनतीने नाही मिळत, ती कोणत्या दिशेने करतात यावर अवलंबून असते. आजच्या तरूणाईमध्ये गती आहे, मात्र त्यांच्यामध्ये दिशेचे ज्ञान नाहीये. तसेच अनेकवेळा मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही. अशावेळी आपण नशीबाला दोष देत असतो. मात्र अपयशाचे कारण हे आपल्या चूका असू शकतात याबाबत फारसा विचार केला जात नाही. आपण करत असलेली मेहनत योग्य दिशेने होत आहे की नाही, याबाबबत योग्य आकलन केले पाहिजे. तुमचे करिअर केवळ मेहनतीने घडणार नाही, त्यासाठी स्मार्ट वर्कची गरज आहे,” असे मत मुनिश्री प.पु. १०८ पुलकसागर महाराज यांनी व्यक्त केले.
तसेच इतरांच्या निर्णयावर अवलंबून न राहता, स्वत:ची रूची, क्षमता यांचा विचार करून स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे आणि सुनियोजित पद्धतीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे नववे पुष्प गुंफतांना ‘स्मार्ट करिअर‘ या विषयावर ते बोलत होते. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, सुजाता शहा, संजीव नाईक, सुदिन खोत हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुनिश्रींचे पादप्रक्षालन करून करण्यात आली. कमल कासलीवाल , संजय नाईक परिवार यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला. यानंतर प्रगती महिला सोशल ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
रविवारी (दि २०) दुपारच्या सत्रात भक्तांबर स्त्रोत्राचे शास्त्रोक्त पद्धतीने अनुष्ठान कसे करायचे याविषयी सुजाता फुलफगर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने जैन भगिनी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होत त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने भक्तांबर अनुष्ठानाचे मार्गदर्शन तर घेतलेच तसेच मंत्राबद्द्ल जाणून घेत अर्घ्यदेखील दिले. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल,कार्याध्यक्ष मिलिंद फडे ,अंजली शहा,आनंदी शहा, गंधाली कोठडिया हया व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी सुजाता फुलफगर म्हणाल्या, ‘भगवान,भक्त आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे “भक्तांबर‘ स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या प्रत्येक बीजाक्षरामध्ये अलौकिक शक्ती आहे. यांच्या नियमित उच्चाराने विविध आरोग्यविषयक समास्यांचे निराकरण होते. त्यामुळेच या भक्तांबर अनुष्ठानाला विशेष महत्व प्राप्त होते.”
या महोत्सवात रविवारी (दि. २०) सायंकाळी खासदार राजू शेट्टी यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच मुनिश्रीनी कोल्हापूरला यावे असे निमंत्रणही दिले.यावेळी राजू शेट्टी म्हणाले की,कोल्हापूर सांगली परिसरात जैन समाज मोठा असून तो प्रामुख्याने शेती व्यवसायात आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती करणारे हे जैन शेतकरी बांधव जैन आचारांचे आचरण करीत असतात. सध्या राज्यात शेतकरी हे मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अध्यात्म अतिशय उपयुक्त ठरेल. त्यामुळे मुनिश्रींनी कोल्हापूरला येऊन तेथील लोकांना मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी यावेळी केली.
२१ ऑगस्ट कार्यक्रम – सकाळी ९ वाजता मुनिश्रींचे “मिठी जुबान का जादू‘ याविषयावर प्रवचन होईल. या चातुर्मासानिमित्त रसिकलाल एम धारिवाल फाउंडेशनतर्फे ३ सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर. एम. धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे.



