सुशीलकुमार शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर
सोलापूर : ‘सनातन’वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी जोरकसपणे मांडत असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र तत्कालीन राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे. राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा न केल्यामुळे ‘सनातन’वर बंदी घालण्याचा निर्णय होऊ शकला नाही, असे शिंदे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
दहशतवादीविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना अटक केली आहे. या अटकेच्या पाश्र्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. ‘‘आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा अहवाल केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारकडे दिला होता’’, असे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रात तेव्हा काँग्रेसचेच सरकार असताना महाराष्ट्र सरकारने ‘सनातन’वर बंदी घालण्याबाबत पाठवलेल्या या अहवालावरून काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे.
सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवला तेव्हा मी केंद्रात गृहमंत्री नव्हतो, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘‘महाराष्ट्र शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव त्याआधी म्हणजे साधारणत: २००८ मध्ये पाठविला. मी २०१२ मध्ये केंद्रात गृहमंत्री झालो. मात्र, तरीही त्या वेळी आपल्याकडे संबंधितांनी पाठपुरावा केला असता तर हा बंदीचा निर्णय कदाचित मार्गी लागला असता. हा प्रस्ताव ज्या तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात आला त्यांचे नाव उघड करावे, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल’’, असे शिंदे म्हणाले.
या प्रश्नावर यापूर्वीही एक-दोन वेळा असेच आरोप झाले होते, त्या वेळीही आपण खुलासा केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.