‘जिलेटीन पेपर आहे का? अजून कुठला कुठला डेकोरेटिव्ह पेपर आहे आणि काय काय डेकोरेटिव्ह मटेरियल आहे ते दाखवा जरा.’ दुकानात आपल्या मुलासोबत आलेल्या बाईंनी दुकानदाराला पटापट सगळं काही विचारलं आणि परत आपल्या मुलाकडे मोर्चा वळवला. ‘सगळी सुट्टी खेळण्यात घालवली. तरी मी सांगत होते रोज थोडा थोडा होमवर्क कर आणि काय काय प्रोजेक्ट दिलं आहे ते आधीच सांग. म्हणजे स्कुल सुरू झाली की धावपळ होणार नाही.’ मुलगा मात्र दुकानदाराने काढून ठेवलेले डेकोरेटिव्ह मटेरियल बघण्यात गुंग होता. ‘आई हे पण घे आणि ते पण पाहिजे मला.’
सगळी खरेदी करून ती दोघे दुकानाच्या बाहेर पडलीत. त्यांच्या संभाषणात मी मात्र विसरूनच गेले की काय घ्यायला दुकानात आले होते. मी त्या डेकोरेटिव्ह मटेरियल मधेच दंगून गेले. डेकोरेटिव्ह मटेरियल, होम वर्क आणि प्रोजेक्ट म्हणजे दिवाळी अभ्यास-वही… याची आठवण झाली आणि हसू आलं. म्हणजे परिस्थितीत तसा काही फारसा बदल झालेला नाही तर … गृहपाठाचं होमवर्क झालं आणि उपक्रमाचं प्रोजेक्ट. काहीही असो पण दिवाळी अभ्यास तेव्हाही होता आणि आजही आहेच की!
सहामाही परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी लागण्याआधी सर्व विषयाच्या शिक्षकांनी दिवाळीसाठी अभ्यास किंवा काही तरी उपक्रम दिलेला असायचा. साधारण भाषा असेल तर पुढील धडे वाचणे, निबंध आणि पात्र लेखनासाठी विषय, गणित असेल तर पाढे आणि बाकी विषयांसाठी प्रश्नोत्तरे असा हा दिवाळीचा अभ्यास दिला जायचा. त्याची खरं तर वेगळी वहीच केली जायची, ती म्हणजे दिवाळी अभ्यास-वही. अगदी सुट्टी लागल्यावर दुसऱ्याच दिवशी ‘दिवाळी अभ्यास-वही’ असं लिहून शुभारंभ केला जायचा. मग मात्र दिवाळीची खरेदी, फटाके आणि खेळ यातच रममाण झालेले असायचो. मोठी मंडळी रोज आठवण करून द्यायची दिवाळीच्या अभ्यासाची. अजून वेळ आहे, मग करेन मी, असं सांगून टाकायचे. घरातलेही म्हणायचे, दिवाळी झाली की होईल अभ्यास. दिवाळीचे चार दिवस कसे भुर्रकन निघून जायचे ते कळायचे नाही. मग मात्र आता दिवाळीचा अभ्यास कसा पूर्ण करायचा, याचं टेन्शन यायचं. अभ्यास पूर्णही करायचा आणि सोबत वहीची सजावट. घरातील जमवलेल्या वस्तू या वेळी उपयोगाला यायच्या. जुन्या लग्नपत्रिका, ग्रीटिंग कार्डपेपरमधील दिवाळीचे फोटो इत्यादी सगळं साहित्य जमवलं की दिवाळी अभ्यास-वहीची सजावट करायला सुरुवात व्हायची. कधी कधी एखाद्या विषयाचा अभ्यास राहिला असला की अंदाजे पाने लागतील तेवढी सोडून पुढील विषयाला सुरुवात व्हायची. शाळा सुरू झाली की, दिवाळीत काय काय मजा केली याच बरोबर दिवाळी अभ्यास-वही पूर्ण आहे का याचीही चर्चा व्हायची. मग एक दोन मैत्रिणी सांगायच्या, ‘अगं मी मामाकडे गेले होते ना तिकडे नव्हती वही नेली. त्यामुळे थोडा अभ्यास बाकी आहे. अजून २-३ दिवसांनी बाई मागतील ना वही तोपर्यंत पूर्ण करून देऊ.’
पुढल्या आठवड्यात सगळ्यांनी दिवाळी अभ्यास-वही आणा’ असं बाईंनी सांगितली की वही पूर्ण करायची मात्र धांदल उडायची. अखेर तो दिवस उजाडायचा. बाईंच्या टेबलावर सगळ्यांच्या रंगेबिरंगी कव्हर असलेल्या दिवाळी अभ्यास-वह्या विराजमान झालेल्या असायच्या…
‘मॅडम आपको भी ये मटेरियल चाहिये क्या ?’ दुकानदाराच्या या प्रश्नाने, डेकोरेटिव्ह मटेरियल बघण्यात दंग झालेले मी भानावर आले. मोती साबण आणि दिवाळी ही जशी परंपरा जपली आहे, त्याच प्रमाणे दिवाळी अभ्यास-वही ची परंपराही शाळेने जपली आहे, या विचाराने मी सुखावून गेले!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068