चौथी सीट (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

चौथी सीट म्हणजेच फोर्थ सीट… ट्रेन मधली चौथी सीट.. या चौथ्या सीटला मुंबईकरांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चौथ्या सीटचा शोध कोणी आणि कसा लावला असेल? बहुदा कधी तरी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवाशाने थोडे थोडे सरकूनच ही चौथी सीट निर्माण झाली असावी. असो…त्या प्रवासी व्यक्तीचे खूप आभारच मानायला हवेत. गर्दीच्या वेळी या चौथ्या सीटवरही बसायला मिळण्याचं भाग्य लागतं.  रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्याला माझं म्हणणं नक्की पटेल.
मुंबईकरांचं जीवन सतत धावपळीचं. धावतपळत येऊन ट्रेनमध्ये चढल्यावर, ती भरलेली दिसली की चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. मग शोध घेतला जातो — कुठे तरी चौथी सीट तरी बसायला मिळते का याचा. त्या बसल्यात तिघी जणी जरा बारीकच वाटताहेत…म्हणजे नक्की चौथ्या सीटला पुरेशी जागा मिळणार हे लक्षात आल्यावर आणि पटकन जाऊन ती पटकावल्यावर आनंद अवर्णनीयच असतो. ‘पुरेशी जागा’ असे मुद्दामच म्हटले आहे, काही वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल. नाहीतर फक्त चौथ्या सीटवर टेकायला मिळते. त्यात लांबचा प्रवास असेल तर मग टेकू दिलेल्या अवस्थेत शेवटपर्यंत खिंड लढवायला लागल्यासारखी अवस्था होते.
पूर्वी ट्रेनमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सीटसाठी क्लेम लावला जायचा पण काही काळानंतर चौथ्या सीटवरही क्लेम लावला जाऊ लागला . एक भाबडी आशा असते बहुतेक वेळा हळूहळू सरकत सरकत का होईना पण आपले स्टेशन येईपर्यंत दुसऱ्या किंवा तिसऱ्या सीटपर्यंत तरी आपण नक्की पोहोचू. कधी कधी ही भाबडी आशा पूर्णही होते जर बाजूला बसलेले प्रवासी मधल्या कुठल्या स्टेशनला उतरणारे असले की!  प्रत्येक स्टेशनला कोण क्लेम लावतो आहे, यावर बारीक लक्ष ठेवायलाच लागतं आणि मग दुसऱ्या, तिसऱ्या सीटसाठी क्लेम कोणी लावला की चौथ्या सीटवरचा प्रवासी घाईघाईत सांगूनच टाकतो — मी शिफ्ट होणार आहे, तुला चौथी सीट मिळेल. क्लेम लावलेली व्यक्ती जर नेहमीची प्रवासी असेल तर बरं म्हणते … चौथी का होईना पण बसायला तरी मिळेल. मात्र नेहमीच प्रवासी नसला तर तो उगीचच हुज्जत घालत बसतो की मी क्लेम लावलेल्या जागीच बसणार.  मग चौथ्या सीटवरच्या प्रवासाचा पारा असा काही चढतो ते विचारायलाच नको. हिंदी मिश्रित मराठीत (मुंबईकरांची अशी एक वेगळीच भाषा आहे! ) सगळे नियम सांगितले जातात. (हे प्रवाशांनी ठरवलेलं, त्याचे स्वतःचे खास नियम आहे, त्याचा रेल्वे प्रशासनाचा काहीही संबंध नाही.) आजूबाजूच्या प्रवाशांनाही यात सामील करून घेतलं जात. आणि हे असे नियम आहेत असं त्यांच्या मुखातून वदवूनही घेतलं जातं. नवीन प्रवाशाला हे सगळं पूर्ण ऐकूनच घ्यावं लागतं आणि तो चौथ्या सीटवर जागा कमी असेल तर विराजमान होण्याचा पराकाष्टेचा प्रयत्न करतो. दुसऱ्या वेळी मात्र हाच प्रवासी कोण्या एका नवीन प्रवाशाला त्याच्या स्टाईलमध्ये चौथ्या सीटचे नियम सांगतानाही दिसतो.
दोन्ही बाजूला चौथ्या सीटवर कोणी बसलेलं असेल, तर त्यामधून अंतर कापत जाणे हे मोठे दिव्य पार पडावे लागते. तेही तिघांना. चौथ्या सीटवरील प्रवाशाला एक तर उठावे लागते किंवा थोडे वाकडेतिकडे बसून जागा करून द्यावी लागते. आणि त्या चिंचोळ्या वाटेतून जाणाऱ्या प्रवाशाला तर कसे कुठून पलिकडे पोहोचायचे हा यक्षप्रश्न असतो.
त्यात ट्रेनमधील फेरीवाल्यांची ये-जा सुरूच असते. हा आणखी एक होणारा त्रास चौथ्या सीटवरील व्यक्तीला सहन करावा लागतो. (कारण सतत ये-जा करण्यामुळे त्यांना एकतर उठावे तरी लागते किंवा थोडे आकुंचन पावून जागा करुन घ्यावी लागते) खरेदी करण्याचा वेळी हवेहवेसे वाटणारे फेरीवाले गर्दीच्या वेळी अगदी नकोसे वाटतात.) नाहीतर ‘आज क्या वो मेरा ड्रेस, मेरी माप की बांगडी लाये हो क्या?’ असं विचारणारी व्यक्ती गर्दीच्या वेळी मात्र ‘काय या फेरीवाल्यांना गर्दीच्या वेळी हाच डबा मिळतो का?…कशाला येतात तडमडायला’ असे खुन्नस देऊन सुनावण्यातही येते.
कमी अंतरासाठी उदाहरण द्यायचंच झालं तर चर्चगेट ते दादर – चौथ्या सीटवर बसणं थोडं तरी सुसह्य असतं. पण चर्चगेट ते विरारपर्यंत चौथ्या सीटवरच बसावं लागलं तर त्याची ‘व्यथा’ त्या व्यक्तीलाच माहीत (कारण एकदीड तासाच्या प्रवासात अवघडून बसल्यामुळे पाठ आणि कंबर याचे परस्पर होणारे हाल काय ते वर्णावे!) असे हे ट्रेनमधील चौथ्या सीटचे माहात्म्य, ट्रेनमध्ये उभ्यानेच प्रवास करावा लागला की प्रकर्षानं जाणवतं.
पूर्णिमा नार्वेकर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...