पुणे : सज्जन लोक शांत आहेत म्हणून अपप्रवृत्ती बळावतात या गांधीजींच्या वाक्याचा संदर्भ देत समाजात जेथे वाईट प्रवृत्ती दिसेल तेथेच तीला आपल्या सर्व ताकतीनीशी प्रतिकार करा म्हणजे समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसेल असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
कर्नाटक हायस्कूलच्या प्रेक्षागृहात झालेल्या द ब्रदरहूड फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणा–या पुण्यभूषण पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बापट बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश गोयल, प्रविण बन्सल, संजय अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
बापट म्हणाले की, चांगल्या गुणांचा, प्रवृत्तीचा सत्कार येथे केला जात आहे. त्यांच्या कर्तृत्वापासून समाजाला प्रेरणा मिळेल. म्हणून हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणवंतांचा सत्कार हे कार्यक्रम मी कधी चुकवत नाही. अशा कार्यक्रमांमुळे समाजामध्ये अजूनही चांगल्या लोकांना चांगले म्हणणे आणि पुढे आणने ही प्रक्रिया थांबलेली नाही याची खात्री पटते. अशा कार्यक्रमांना प्रसिध्दी मिळाली पाहिजे.
या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगीरीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. मधुसुदन झंवर, सामाजिक क्षेत्रामध्ये लेक वाचवा अभियानाचे बँड अॅम्बासिडर डॉ. गणेश राख, क्रीडा क्षेत्रात टेबलटेनिसपटू दिव्या देशपांडे, कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ यांचा पुण्य भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. डॉ. सतिश देसाई, कृष्णकुमार गोयल, अजय गुप्ता, विजय मित्तल, राहुल अग्रवाल, यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
डॉ. वासुदेव गाडे– शिक्षण क्षेत्रात दर्जा राहिला नाही म्हणून सार्वजनिक शिक्षण संस्थांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मूल्यवान शिक्षण देणे हे आव्हान आहे. आज होत असलेला माझा एकट्याचा नसून सर्व सहकारी कर्मचा–यांच्या मेहनतीचे फळ आहे. हा सत्कार विद्यापीठाच्यावतीने मी स्विकारतो. विद्यापीठाची नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती. हे बदलणे अत्यंत आवश्यक होते. विद्यापीठ शिक्षणाच्या दर्जात जगातले १९१ वे आणि देशातले दुस–या क्रमांकाचे विद्यापीठ बनले. हे सगळे बदलू शकले कारण विद्यापीठातील सर्व कर्मचारी, सहकारी आणि विद्यार्थी यांनी त्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे.
डॉ. मधुसुदन झंवर– समाजाने हे काम करण्यास मला प्रवृत्त केले. पाच दिवस व्यवसायासाठी व दोन दिवस समाजसेवेसाठी देण्याचे काम गेली चाळीस वर्षे करत आहे. प्रायव्हेट प्रॅक्टीस करुन तुम्ही समाजसेवा करु शकता हे आम्ही दाखवून दिले. विनोबा भावे म्हणायचे सेवा म्हणजे ज्यामध्ये करुणा, दया आणि सहकार्य देणे आहे. या विचारांना समोर ठेवून काम करत आहे. मदर तेरेसा यांनी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. हा माझा एकट्या चा नसून माझ्या टीमचा सत्कार आहे. तो मी प्रातिनिधीक स्वरुपात स्विकारत आहे.
डॉ. गणेश राख– मुलाच्या जन्माचे सगळेजण आनंद साजरा करायचे. पण मुलीचा जन्म झाला की बील भरायला सुध्दा टाळाटाळ करायचे. त्यामुळे मी मुलींच्या जन्माचे स्वागत करु लागलो. माझ्या दवाखान्यात जन्माला येणा–या मुलीची फी मी घेत नाही. आता माझ्या चळवळीत दहा हजार डॉक्टरांनी साथ दिली आहे.
सत्कारार्थी अमेय वाघ, दिव्या देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

