पुणे :मुंबईत विर्लेपार्ले मिठीबाई कॉलेज येथील भाईदास सभागृहात आयोजित राष्ट्रीय छात्र संम्मेलन बंद पाडून पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचे विरोधक म्हणून ख्याती पावलेले गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांना येथे भाषणबंदी ,प्रवेश बंदी केली तर दुसरीकडे गेल्या ३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेत केलेल्या भाषणातून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुजरातचे वडगाम येथील आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेच्या उमर खालिद याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या एका तरुणाने त्यांच्या विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 31 डिसेंबर रोजी शनिवारवाड्यासमोर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हे दोघे सहभागी झाले होते. त्यावेळी दोघांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप करुन अक्षय बिक्कड या मुळच्या लातूर येथील तरुणाने डेक्कन पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणांचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या १५३ अ, ५०५ व ११७ या कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
छात्रभारती आयोजित राष्ट्रीय छात्र सम्मेलन आज मुंबईत होणार होते ,कोरेगाव भीमा प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर या संमेलनात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होते. दोघांनी काल शांततेचं आवाहन केले होते. आज 4 जानेवारीला छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र सम्मेलनाला दोघेही उपस्थित राहणार होते.
कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे एकबोटे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल
दरम्यान कोरेगाव-भीमा येथील घटना व दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, अनिल दवे यांच्यासह अज्ञात वीस ते पंचवीस जणांविरुद्ध शहरातील छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. तीन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावसिंगपुरा येथील जयश्री सुदाम इंगळे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे.
त्यानुसार छावणी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. छावणी पोलीसांनी हे प्रकरण शिक्रापूर (जि. पुणे) पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.