पुणे- विधानसभेच्या येत्या निवडणुकीत, राज्यात भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करणार असून पावणेदोनशे आमदार निवडून आणू अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या भाजपच्या सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या ‘मूहबंदी ‘मागे नेमकं दडलंय तरी काय ? असा प्रश्न आता राजकीय समीक्षकांना पडला आहे .
नोटबंदी चे समर्थन करणारा देशातील लक्ष्यवेधी मोर्चा ज्यांनी पुण्यात काढला . ज्यांचे मुख्यमंत्र्यांशी सख्य आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,शिक्षणमंत्री विनोद तावडे ,महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बरोबर वाटचाल …असे खा. संजय काकडे हल्ली आहेत तरी कुठे ? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे .
पुण्याचे आणि राज्याचे भाजपांतर्गत राजकारण ज्यांच्या मुळे मिडीयात सातत्याने प्रवाही राहू लागले होते . ते ‘वारे’ आता शांत झाल्यासारखे दिसत आहे . ही शांतता नेमकी पुढे ‘वादळ ‘ निर्माण करणारी ठरेल ..कि आणखी काही रंग राजकारणात भरेल हे अर्थात येणारा काळच सांगणार आहे .
पुणे महापालिकेच्या राजकारणात त्यांनींच भरपूर रंग भरले ,विवादांची पर्वा न करता अनेकांना भाजपा प्रवेशाची कवाडे खुली करून देत, त्यांनी आपल्या विविध राजकीय खेळ्या करत , महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात यश मिळविले . आणि इतिहासात प्रथमच भाजपला येथे १०० नगरसेवक मिळाले. अर्थात हे पाशवी बहुमत असल्याची टीका विरोधकांनी केली, आणि करत आहेत .
पुणे महापालिकेतील २४तास पाणीपुरवठ्याच्या टेंडर प्रक्रियेत गौडबंगाल होत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि हे गौडबंगाल ५०० कोटीचे असल्याचे फेरटेंडर काढल्यावर स्पष्ट झाले.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ५० वर्षे राजकीय कारकिर्दीत ४० वर्षे सत्ता उपभोगली असताना त्यांना शेतीमालाला हमीभाव द्यायला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सुचले नाही. शेतीला हमीभाव मिळाला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. विरोधात असल्याने शरद पवारांना मोदी सरकारची धोरणे फसवी वाटू लागली आहेत. ते विरोधकांची भूमिका उत्तम करीत असून त्यांनी ती कायम बजवावी,’ अशा बोचऱ्या शब्दांत थेट शरद पवार यांच्यावर काकडे यांनी टीका केली . त्यानंतर भाजपपासून फारकत घेतल्यास शिवसेनेवर मोठी नामुष्कीची वेळ येईल अशी टीका हि त्यांनी केली होती .
भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी नोटबंदी, एक देश एक करासाठी जीएसटी, स्वच्छ भारत, जलयुक्त शिवार, कर्जमुक्त शेतकरी, मेक इन इंडिया, प्रत्येकाला हक्काचे घर आदी अनेक योजना केंद्राने सुरू केल्या आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या या योजना घराघरांत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असे ठणकावून सांगणारे खा. काकडे सध्या मात्र गेल्या 2 महिन्यांपासून गप्प गप्प आहेत. मिडियाशी बोलणेही त्यांनी टाकून दिले आहे.
त्यांचे राजकीय वर्तुळातील आणि पुण्यातील ‘अत्यंत प्रिय’ मानले जाणारे सहकारी असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आणि काकडे यांच्यातील सुप्त स्पर्धेचे जे वारे सतत घोंगावत राहिले होते . ते देखील आता नाहीसे झाले आहे .
पुण्यात शिवसृष्टी, सायकल ट्रॅक ,बालगंधर्व रंगमंदिरा नंतर आता पार्किंग धोरणाचा विषय भाजपाला हैराण करतो आहे . ज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत सख्य आहे असे मानले जात, त्या काकडे यांचे अद्यापही मुख्यमंत्र्यांशी असलेले ‘सख्य ‘ कायम असतानाही नेमकी कुठे माशी ‘शिंकते आहे ? राज्यात जिथे भाजप कमजोर पडू शकते अशा विधानसभा मतदार संघांची जबाबदारी घेवू पाहणारे , ५२ आमदारांसाठी ‘दिव्य ‘ पणाला लावण्याची भाषा करणारे संजय काकडे सध्या गप्प गप्प आहेत .त्यांचा कसला अभ्यास सुरु आहे ?या मागे काही राजकीय रहस्य दडले आहे काय ?कि स्वतःच्या व्यवसायात ते खूपच व्यस्त झाले आहेत ? अशा प्रश्नांवर आता राजकीय समीक्षकांना सतर्क रहावे लागेल असे दिसते आहे .