बाणेर मधील कोविड सेंटरची पाहाणी
पुणे- महापालिकेने ज्या पद्धतीने यंत्रणा उभारली आहे, ते पाहता आगामी काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पुणे महापालिका सक्षम असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे व्यक्त केला.
बाणेर मध्ये महापालिकेच्या माध्यमातून २०० बेड्सचे केविड केअर सेंटर उभारण्यात येत असून या सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांतदादा पाटील यांनी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज श्री. पाटील यांनी या सेंटरची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे,नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, नगरसेविका ज्योती कळमकर स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर सहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश तात्या बालवडकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर कोविड प्रतिबंधात्मक काम सुरू आहे. महापालिकेच्या माध्यामातून आजपर्यंत तीन हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आताही २०० बेड्सचे केविड केअर सेंटर बाणेर मध्ये सुरू होत आहे. याचे काम पाहून अतिशय सणाधान वाटले. या सर्व कामांची गती पाहता पुणे महापालिका आगामी काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
लसीकरणावर बोलताना श्री. पाटील पुढे म्हणाले की, लसीकरण हा विषय महापालिकेच्या अखत्यारीतील नसून, तो राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. उत्पादन ज्या पद्धतीने होत आहे, त्यानुसार पुरवठा होत असून, तो संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, लस उपलब्धते संदर्भात जे सीरम आणि भारत बायोटेकचे जे करार झाले आहेत, त्यानुसार ५० टक्के केंद्र सरकार, २५ टक्के निर्यात आणि २५ टक्के व्यवसायिक वापरासाठीचे तत्व ठरले आहे. त्यापैकी आपत्तीच्या कायद्यानुसार केंद्र सरकारने निर्यातीसाठी कंपन्यांना लस राखून ठेवण्याचे जे अधिकार होते ते रद्द केले असून तो साठाही केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. उर्वरित व्यवसायिक वापराचा कोटा हा खासगी रुग्णालयांना थेट विकता येणे शक्य असल्याने, रुग्णालये ते खरेदी करुन उपलब्ध करून देत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, बाणेर येथे सुरू असलेल्या कोविड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना लवकर आराम मिळावा यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आयुष-६४ गोळ्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले. श्री. पाटील यांच्या हस्ते आयुष-६४ च्या गोळ्यांचा बॉक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांना देण्यात आला.