पुणे-दिनांक १३ डिसेंबर रोजी काही राजकीय पक्ष आणि संघटना यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत होत असलेल्या अवमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून संभाजी महाराज पुतळा टिळक चौकातून सकाळी ९ वाजता मोर्चा काढण्याचे ठरविल्याने पोलिसांच्या वाहतूक विभागाने दैनदिन वाहतूक मार्गात तात्पुरते बदल केले आहेत तर दुसरीकडे विनापरवानगी आंदोलनास बंदी घालून पुणे पोलिसांनी (या मोर्चा व्यतरिक्त ) शहरात जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत .
विशेष शाखेचे उपायुक्त आर राजा यांनी उद्यापासून १४ दिवस ३७ (१)(३) कलम लागू केले आहे , ज्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या परवानगी शिवाय मोर्चा , आंदोलन ,मिरवणूक, सभा घेता येणार नाही . घोषणा देणे , वाद्य वाजविणे , कोणाच्याही प्रतिमांचे दहन करणे अगर प्रतीकात्मक प्रेताचे , छायाचित्रांचे प्रदर्शन करणे, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे यास बंदी घालण्यात आली आहे.
तर पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी डेक्कन , विश्रामबाग , फरासखाना , आणि समर्थ पोलिसांच्या हद्दीतील वाहतूकव्यवस्था उद्या सकाळी ९ पासून मोर्चा संपेपर्यंत किंवा त्यांना आवश्यक वाटेल तोवर काही भागातील बदलली आहे.यात लक्ष्मी रोड , बाजीराव रोड, केळकर रोड,गणेश रोड ,येथील काही भागातील वाहतूक मोर्चा जाईपर्यंत वळविली आहे.तिलक चौक ते बेलबाग चौक नो पार्किंग करण्यात आले आहे.

