पुणे : ओला, उबेर यांच्या खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देताना अस्वस्थ झालेल्या रिक्षा संघटनांच्या नेत्यांनी आता शेअर रिक्षा योजना शहर आणि परिसरात सर्वत्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बस च्या दारात प्रवाश्यांना सेवा मिळेल असा दावा करण्यात येत आहे मात्र शेअर रिक्षा प्रकार लुटमारीच्या प्रकारांना उत्तेजन देईल काय ? यावर पोलिसांच्या वर्तुळात मात्र खल होणार आहे . रिक्षा संघटनांच्या नेत्यांच्या अस्तित्वासाठी कि खरोखर प्रवाश्यांना स्वस्तात मस्त सेवा देण्यासाठी हे नेते पुढे येत आहेत ?असाही सवाल यावर ग्राहक हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातो आहे .
शेअर रिक्षा सुरू करण्याबाबत गुरुवारी शहरातील चौदा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सर्व संघटनांनी शेअर रिक्षा पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. तसा प्रस्ताव संघटनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर केला आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेले दरपत्रक, पायाभूत सुविधा आणि वाहतूक पोलिस व्यवस्था त्वरित निर्माण करून देण्याची मागणी या वेळी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. तसेच या संदर्भात महापालिका आयुक्त, वाहतूक पोलिस उपायुक्त यांनी सर्व रिक्षा संघटनांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी विनंतीही या वेळी संघटनांच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, तसेच विविध संघटनांचे ऍड. नाना क्षीरसागर, बापू भावे, दिनकर पाटील, विजय धुमाळ, अंकुश माने, अरविंद धुमाळ आदी या वेळी उपस्थित होते
शासन स्तरावर यापूर्वी मंजूर झालेल्या शेअर रिक्षाच्या प्रस्तावावरच रिक्षा संघटनांनी नव्याने प्रस्ताव तयार केला असून, तो प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर केला. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना पीएमपीच्या तिकिटाच्या दरातच प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस या वेळी संघटनांकडून व्यक्त करण्यात आला.
सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर कोथरूड-डेक्कन, शिवाजी पुतळा (कोथरूड) – डेक्कन, सिंहगड रस्ता-स्वारगेट आणि भारती विद्यापीठ ते स्वारगेट अशा चार मार्गांवर शेअर रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांना देण्यात आले आहे.
आता सर्वत्र शेअर रिक्षा .. रिक्षा संघटनांच्या नेत्यांचा नवा पवित्रा
Date:

