पुणे- गेल्या पावसाळ्यात भिडे पुलावरून पाणी वाहत असताना अडकलेली गोमाता ,आणि यंदा खडकवासल्यातून पाणी सोडताच अडकलेले मांजर आणि कुत्रे … यांचे चित्रीकरण करून अशा दुर्दैवी घटना लोकांपर्यंत ‘मायमराठी’ ने पोहोचविल्या आणि अखेर अशा प्राण्यांना वाचविण्यासाठी लोक पुढे येवू लागले. याची प्रचीती आज आली .पुण्यातील काही तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका कुत्र्याला वाचवले. आज सकाळी खडकवासला धरण परिसरातील ही घटना. 25 फूट खोल पडलेल्या कुत्र्याला तर या तरुणांनी वाचवले. मात्र, स्वतः त्याठिकाणी अडकले. काही वेळाने अग्निशामक दलाने या तिघांची सुखरूप सुटका केली.
महेबूब विजापुरकर(२०),अजय मराठे(२४), सचिन यादव(२४) सर्व राहणार वारजे माळवाडी, पुणे अशी या तिन्ही तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या मो-यांच्या पुढे एका छोट्या पुलाच्या ठिकाणी किना-याला जवळपास 25 फूट खोलीवर आज सकाळी एक जिवंत कुत्रे पडले. स्थानिकांनी याबाबतची माहिती अग्निशामक दलाला कळविली. त्याचवेळी महेबूब, अजय आणि सचिन हे तिघेही तेथे खडकवासला डॅम फिरायला आले होते. त्यांना इथे हे कुत्रे पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ एका टेम्पोवाल्याला थांबवून स्वतः पाण्यात उतरुन कुत्र्याला सुखरूप वर पाठवले. मात्र, त्यानंतर तिघांना वर येणे शक्य झाले नाही. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान तिथे पोहोचले. त्यांना कुत्र्यांऐवजी तीन तरुण एका दगडावर उभे असून चहुबाजूंनी पाण्याचा प्रवाह फिरत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ तिघांना एक्सटेंशन लॅडर वापरून सुखरूप बाहेर काढले.
या कारवाईत सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन चालक गणेश ससाणे व जवान शिवाजी आटोळे, विलास घडशी, प्रमोद मरळ आदींनी सहभाग घेतला. मुक्या प्राण्याविषयी तरुणांची असलेली धडपड आणि प्रेमाचे परिसरातील लोकांनी तसेच जवानांनी यावेळी कौतुक केले.