पुणे : “जैव, रासायनिक युद्धाचा धोका अधिक असल्याचे कोरोनाने दाखवून दिले आहे. एकही गोळी न झाडता, बॉम्बस्फोट न होता लाखो लोकांना जीव गमवावा लागला. या लढ्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांनी मोठी जबाबदारी निभावली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव जपणे अत्यंत महत्वाचे आहे,” असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले. ज्ञान ही आत्मसात करण्याची गोष्ट असून, त्याला मूल्यांची व संस्काराची जोड मिळायला हवी. राष्ट्र समृद्ध होण्यासाठी आपल्यातील ‘माणूस’पण जिवंत ठेवायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दत्तात्रय शेकटकर व लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांना माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ‘सुर्यभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता’च्या बावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ‘सुर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नितीन दलाया, लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ. पुष्कराज करमरकर, स्पाईन सर्जन डॉ. रमेश रांका सन्मानित करण्यात आले.
प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “अडचणीत असलेल्यांना मदत करण्याची आपली सेवावृत्ती समाधान देत असते. त्यामुळे आपण जे काम करतो, ते का करतो आणि त्याचा इतरांना चांगला उपयोग होईल, यावर आपण लक्ष दिले पाहिजे. सुर्यदत्ता शिक्षण संस्था केवळ पदवीधर नाही, तर माणूस घडवत आहे.”
नरेंद्र भंडारी म्हणाले, “जगभरात मानवतेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या लायन्स क्लबमार्फत गरजू व गरिबांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजाच्या उत्थानासाठी सर्व लायन सदस्य मेहनत घेत आहेत, याचा आनंद वाटतो. सेवा हाच धर्म मानून आपण काम करावे.”
शेखर मुंदडा म्हणाले, “कोरोना काळात तीन लाख लोकांना मदतीचा हात दिला. दिवाळीच्या निमित्ताने महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या घरी दिवाळी प्रकाशमय होईल, याचा प्रयत्न सुरू आहे. सामाजिक भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव प्रोत्साहन देणारा असतो.”
अरुण खोरे म्हणाले, “महाराष्ट्र हे सामाजिक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. गांधीजींच्या अनेक चळवळीत महाराष्ट्रीयन लोकांचा मोठा सहभाग होता. आपल्यातील समाजभावना आपण कायम जिवंत ठेवली पाहिजे. त्यातून स्वतःचा आणि समाजाचाही विकास होत असतो.”
डॉ. नितीन दलाया म्हणाले, “अलीकडच्या काळात मानसिक आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाचा अतिवापर, होणारे अपेक्षाभंग, दुखावणाऱ्या भावना यातून नैराश्य येऊन मानसिक आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावर समुपदेशन आणि संवाद प्रभावी ठरू शकतो.”
डॉ. रमेश रांका म्हणाले, “कोरोनाच्या लढ्यात भारतीयांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. मात्र, हा लढा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सूर्यदत्ता या काळातही उत्साहाने करत असलेले कार्य प्रेरणा देणारे आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविकात सांगितले की, समाजाच्या, देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करून विद्यार्थी-शिक्षकांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आहे. आजच्या कोविडच्या परिस्थितीचे भान ठेवून सर्व नियम पाळून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.