मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकांनी जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद ३७० व ३५-अ हटवल्याचे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जबरदस्त स्वागत केले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या या निर्णयाचे लोकांमध्ये मिठाई वाटून स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला. लोढा म्हणाले की, मोदीजी आणि अमित भाईंनी आपल्या दृढनिश्चय शक्तीचा परिचय देत एक अत्यंत साहसी निर्णय घेतला आहे.
मुंबईमधील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘जहां हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है’ चा नारा देत शामा प्रसाद मुखर्जी यांना पुष्पहार अर्पण करून झाली. मुंबई अध्यक्ष लोढा यांच्यासह आमदार तमिल सेलवण, भाई गिरकर, आमदार राज पुरोहित, अतुल शहा, शायना एनसी यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जम्मू-काश्मीर अनुच्छेद ३८० व ३५-अ हटवण्याचा निर्णय, तसेच जम्मू-काश्मीर व लडाख वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासहित अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने आपसात मिठाई वाटून, एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत नरेंद्र मोदी आणि अमित शहा जिंदाबादचे नारे लगावत जल्लोष साजरा केला. यावेळी राजनीतिक कार्यकर्त्यांसह विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

