पुणे : कथक नृत्याच्या अभिजात परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या 30 नृत्यागनांचा मोहक नृत्याविष्कार अन पटियाळा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे सुमधुर गायन एकाच रंगमंचावर अनुभवण्याची सुसंधी काल रसिक पुणेकरांना लाभली. निमित्त होते प्रकृति नृत्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘संवेदन’ या सांगितिक मैफलीचे.
कथक नृत्याविष्काराला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नृत्यांगना पं. रोहिणीताई भाटे यांच्या जन्मतिथीनिमित्त रंगलेल्या या मैफलीतून गायन आणि पदन्यासाची विलक्षण अनुभूती रसिकांना अनुभवता आली.
ज्येष्ठ सितारवादक अरविंद पारीख, ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर, पं. रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, आध्यात्मिक गुरू डॉ. सुनील काळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
प्रकृति संस्थेच्या संस्थापिका नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘मती अमित गती ललित ‘ या विशेष कार्यक्रमाने मैफलीची सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि प्रत्यक्ष सादरीकरण यांच्या सुरेख मिलाफातून रचनाबद्ध करण्यात आलेला हा कार्यक्रम रसिकांना विशेष भावला. यावेळी रोहिणीताई भाटे यांची ध्वनीचित्रफितही दाखवण्यात आली. रोहिणीताईंच्या पदन्यासाबरोबरच त्यांचे विचार, कलेचा ध्यास, कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन, काळानुरूप त्यांनी आत्मसात केलेले बदल प्रत्यक्ष ऐकण्याचा दुर्मिळ योग रसिकांबरोबरच कलेचे ज्ञान अवगत करणाऱ्या विद्यार्थींनाही लाभला. पडद्यावर रोहिणीताई आणि रंगमंचावर त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिष्या अशा वातावरणाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कौशिकी चक्रवर्ती यांनी त्यांच्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कधी प्रखर तानाचा तिहेरी मध्यम तर कधी मऊमखमली निषाद असा राग श्यामकल्याण कौशिकींच्या सुरातून ऐकताना अधिकच मोहक आणि आकर्षक वाटला. रसिकांचीही भरभरून दाद त्यांच्या सादरीकरणाला लाभली. यावेळी त्यांना पूजा कुलकर्णी, मेघोदीपा गंगोपाध्याय (तानपुरा), पं. अरविंदकुमार आजाद(तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम) यांनी सुरेल साथसंगत केली. हर्षवर्धन पाठक यांची प्रकाशयोजनेने कार्यक्रमाला रंगत आणली. ताल-सूर-लयाच्या सुंदर मिलाफातून रंगलेली ‘संवेदन’ मैफल रसिकांसाठी सांगितिक मेजवानीच ठरली.
…………….


