साहसी खेळांमुळे मधुमेही रुग्णांना फायदा : डॉ. मिलिंद वाटवे
पुणे : माणूस जंगलात राहत असताना शिकारीसारखी साहसी जीवनशैली होती, ती गमावल्याने मधूमेह माणसाच्या जीवनात आला. शहरी जीवनशैलीतील मधूमेह दुरुस्त करायचा असेल तर परत शिकारीकडे वळता येणार नाही, मात्र साहसी खेळ हा मधूमेहावर उपाय आहे, असे प्रतिपादन
डॉ. मिलिंद वाटवे (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’,
आयसर, संस्थेतील जीवशास्त्रज्ञ) यांनी केले.
ते जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘चेजिंग पॅराडाईमस् इन डायबेटीस’ (डायबेटिसच्या बदलत्या व्याख्या)या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ही परिषद ‘इंडियन डायटेटीक असोसिएशन’, पुणे चॅप्टर (भारतीय आहारसंस्था पुणे शाखा) आणि ‘डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि.’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
ही परिषद मंगळवारी दुपारी ‘हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग इन्स्टिट्यूट’ ( मॉडेल कॉलनी )येथे संपन्न झाली.
आहार तज्ज्ञांच्या या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले, ‘रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे म्हणजे मधूमेहावर उपचार अशी अजूनही वैद्यकीय व्यवसायाची श्रद्धा आहे. त्याला अजिबात पुरावे नाहीत. आपले
शरीर जंगलात घडले आहे. ते आता शहरात राहत आहे, त्यामुळे जीवनशैलीतील बदलाने मधुमेहासारखे त्रास होत आहेत. साहसी खेळातून ’न्यूरो एंडो क्राईम पाथ ‘वापरले जातात आणि इन्शुलिन निर्मितीला मदत होते.
‘एंडो क्रॉनिक ग्रोथ फॅक्टर्स निर्माण होणे याने मधुमेहाला दूर ठेवण्यास मदत होते. जंगलातील जीवनशैलीत जी आव्हाने स्वीकारायची मानवाला सवय होती, ती आव्हाने साहसी खेळातून मानवाने पुन्हा स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे
या संशोधनावर आधारित ‘ बिहेव्हीअरल इंटरव्हेंन्शन फॉर लाईफस्टाईल डिसऑर्डर ‘ क्लिनिक ( बिल्ड क्लिनिक ) पुण्यात उभारले जात आहे, अशी माहितीही डॉ. वाटवे यांनी दिली
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ (आयसर) संस्थेतील जीवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे, डॉ. ज्योती शिरोडकर (’डायबेटीससाठी आयुर्वेद’ या भारत सरकारच्या प्रोटोकोल कमिटीच्या तज्ज्ञ सदस्य) आणि ‘डायटेटीक असोसिएशन’च्या शारदा अडसूळ या तज्ज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले. पुण्यातील साधारण 100 डॉक्टर, आहारतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.
यावेळी अजय शिरोडकर (व्यवस्थापकीय संचालक, ‘डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि.’), प्रा. अनुजा किणीकर (‘इंडियन डायटेटीक असोसिएशन’ पुणे चॅप्टर, भारतीय आहारसंस्था, पुणे शाखेच्या अध्यक्ष), आहारतज्ञ मेधा पटवर्धन उपस्थित होते.
मधुमेहाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सर्वंकष असावा असे, मत प्रा. अनुजा किणीकर यांनी व्यक्त केले.
मधुमेही रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या पेटंट मिळालेल्या आहार उत्पादनांचे सादरीकरण या परिषदेत करण्यात आले. त्यात हेल्थ आटा, स्नॅकमिक्स, हेल्थ ड्रिंक यांचा समावेश होता.
आयुर्वेद आणि डायबेटीस’ या विषयावर डॉ. ज्योती शिरोडकर यांनी मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, ‘ नेहमीपेक्षा अधिक घाम येणे हे जसे मधुमेहाचे लक्षण आहे, तसेच सतत वातावरणात पंखा , गार हवा, थंड पाणी हवेसे वाटणे, हेही मधुमेहाचे लक्षण आहे.मधूमेह व इतर नॉनकम्युनिकेबल रोगांच्या भारतातील पसरणार्या महालाटेविरुद्ध काम करण्यासाठी, डायबेटीसच्या बदलत्या व्याख्या समजून घेण्याची नितांत गरज आहे.
आयुर्वेदात मधुमेहाला प्रमेह म्हटले आहे.लठ्ठ असलेल्या रुग्णाला पंचकर्माचा फायदा होतो मात्र, सडपातळ रुग्णाला योग्य आहाराचा उपयोग होतो.
मधुमेह बरा करण्यासाठी आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, आहारतज्ज्ञांची भूमिका यासंदर्भात महत्वाची ठरते.
आधुनिक आहारतज्ज्ञ आणि आयुर्वेदिय आहारतज्ज्ञ यांची भूमिका डायबेटीसची महालाट परतविण्यात निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे. याकरिता जनजागृतीची आवश्यकता आहे
अमेरिकन डायबेटीस असोसिएशन’ने 2011 पासून क्लिनिकल प्रॅक्टिस, गाईडलाइन (CPG 2011) मध्ये समाविष्ट केलेल्या ‘मेडिकल न्यूट्रीशन थेरपी’ या विषयी आधुनिक आहारतज्ज्ञ श्रद्धा अडसूळ यांनी माहिती दिली.
याविषयी बोलताना त्या म्हणाल्या मधुमेही रुग्णाला न्यूट्रीशनल थेरपीचाही उपयोग होतो त्यासाठी रुग्णाच्या आहाराच्या,पोषणाच्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.रुग्णांना आहाराच्या सवयी बदलण्यासाठी प्रेरीत करणे आणि अनेक पर्याय देणे महत्वाचे असते.
‘डॉ. ज्योती शिरोडकर यांच्या दीर्घ संशोधनातून तयार झालेली, इंटरनॅशनल पेटंट मिळालेली हेल्थ फूड आयुर्वेद व आधुनिक आहारशास्त्र यांची सांगड घालून तयार केलेले, प्रयोगशालेय तपासण्या, प्रत्यक्ष रुग्ण/ निरोगी व्यक्ती यावर चाचण्या करून सिद्ध झालेले आहे. विशिष्ट कडधान्ये व तृणधान्ये यावर ग्रंथोक्त संस्कार करून बनविलेली व आरोग्यदक्ष पुणेकर ग्राहकांच्या पंसतीस उतरत आहे,’ अशी माहिती आयआयटी मुंबईचे पदवीधर व ’डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स’ या स्टार्टअप कंपनीचे संचालक अजय शिरोडकर यांनी दिली.
या परिषदेच्या निमित्ताने मधुमेहाची महालाट परतविण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या दिशेने आणि तशी कृती योजना आखण्याच्या दिशेने पाऊल उचलण्य विषयी सर्व तज्ञांनी चर्चा केली.