गांधी परिसंवादाचे निमंत्रण रद्द करण्याचा दबाव आणल्याबद्दल प्र- कुलगुरुंचा डॉ सप्तर्षी यांच्याकडून निषेध
पुणे:
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘ रिव्हीजिटिंग गांधी ‘ राष्ट्रीय कार्यशाळेसाठी म. गांधींचे पणतू तुषार गांधी यांना दिलेले आमंत्रण हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावापोटी रद्द करायला लावल्याबद्दल महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी प्रकुलगुरू डॉ. उमराणी यांचा निषेध केला आहे.
आज सायंकाळी पत्रकाद्वारे हा निषेध व्यक्त केला आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मॉडर्न महाविद्यालयात ७, ८ फेब्रुवारी रोजी’ रिव्हीजिटिंग गांधी ‘ या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना उद्घाटक,वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे सचिव अन्वर राजन यांना बीजभाषणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. दि. ६ रोजी म्हणजे आज अचानक तुषार गांधी, राजन यांना हे निमंत्रण रद्द केल्याने आपण येऊ नका, असे निरोप संयोजकांनी दिले.
याबाबत डॉ.कुमार सप्तर्षी यांनी अधिक माहिती घेतली असता, पतीत पावन संघटना, प्रदीप रावत यांनी तुषार गांधी, अन्वर राजन यांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी यांच्या मार्फत दबाव आणल्याची माहिती मिळाली. हे निमंत्रण रद्द करावे, असे पत्र संबंधितांनि उमराणी यांना दिले होते.
दोन्ही वक्त्यांनी मांडलेल्या विचारांवर मी अध्यक्ष म्हणून समर्थपणे मत मांडू शकतो, अशी भूमिका डॉ. गजानन एकबोटे यांनी या प्रकरणी घेतली होती. मात्र, तरीही निमंत्रण रद्द केले गेले.
‘ देशातील सर्व राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, त्यांनी नियुक्त केलेले कुलगुरू , प्र- कुलगुरू हे देखील संघाचे आहेत, त्याच विचारसरणींचे वक्ते परिसंवादात यावेत, अशा धोरणाचा आपण निषेध करीत आहोत, असे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी पत्रकात म्हटले आहे.