आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करत आहेत : महापौर मुक्ता टिळक
पुणे :
‘आदिवासी जमातीच्या जीवनसंकृतीवरील छायाचित्रे पाहून आदिवासींच्या जीवनशैलीतील विविधतेची कल्पना येते. या प्रदर्शनातून आपल्या बांधवांच्या अनेक प्रतिमा,त्यांचे राहणीमान, त्यांची संकृती, त्यांची आभूषणे पाहायला मिळाली त्यामुळे त्यांच्या जीवनमानाची कल्पना येते. आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करत आहेत.या चित्रप्रदर्शनमुळे पुणेकरांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडेल.आदिवासी जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नृत्य आणि कलाकौशल्य ते जगासमोर यावे आणि त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळावा यासाठी आपण योगदान दिले पाहिजे,’ असे उद्गार आज ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी महापौर मुक्ता टिळक यांनी काढले.
‘आपल्या देशात विविध संस्कृती आहेत त्याचे जतन केले पाहिजे, राहणारे कुशल कलाकार यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. आपल्या देशाची मूळ संकृती टिकविणे आवश्यक आहे. आदिवासी जीवनशैलीवर आधारित हे प्रदर्शन पाहून मी भारावून गेले आहे,हि कल्पकता जपणे पुढच्या पिढीचे कर्तव्य आहे’, असे प्रतिपादन जान्हवी धारिवाल यांनी ‘जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी केले.
मुक्त छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातील 16 राज्यांमधील 125 आदिवासीं जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या इको फ्रेंडली वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘रिजनल अॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’ (‘रामा’) आणि ‘बालमुद्रा डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर’ यांच्या संयुक्तविद्यमाने तसेच ‘रसिकलाल एम. धारिवाल फाऊंडेशन’ च्या सहाय्याने आयोजित हे प्रदर्शन दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळात ‘राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी’, जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड येथे आयोजित करण्यात आले आहेे. प्रदर्शन विनामुल्य आहे. या प्रदर्शनात लांजिया सोरा आणि गोंड हे पुरस्कार विजेते आदिवासी कलाकार तांदळाच्या साळीच्या टरफलापासून गणपती, देवी बनविण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने आदिवासींच्या ‘हेडगेअर्स’ आणि ‘टॅटू’ चे विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. पूर्वा परांजपे यांनी छायाचित्रांना शीर्षक देण्याचे काम पाहिले आहे. यावेळी दिनकर शिलेदार, मीना शिलेदार,श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे, प्रकाश वेलणकर आदी मान्यवर उपस्थित होते.