‘गोळ्या घालून शांतता निर्माण होणार नाही’:असगर वजाहत
‘कला आणि साहित्यात समाजाचे योगदान’ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘मानवाला, समाजाला,संपूर्ण जगाला आज शांततेची गरज असून शांततेच्या माध्यमातूनच ती निर्माण होईल,गोळ्या घालून शांतता निर्माण होणार नाही’,असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमी विजेते ज्येष्ठ हिंदी नाटककार असगर वजाहत यांनी रविवारी केले.
सम्यक उपासक संघ,नालंदा बुद्ध विहार यांनी संयुक्तपणे आयोजित रविवारी सकाळी असगर वजाहत यांचे ‘कला,और साहित्य मे समाज का योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.या व्याख्यानादरम्यान असगर वजाहत यांनी सद्य स्थितीवर भाष्य केले.या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम नालंदा बुद्ध विहार(मॉडेल कॉलनी) येथे झाला.
ते म्हणाले,’मानवाला,समाजाला आणि जगालाही शांततेची आवश्यकता आहे.पण,शांततेसाठी शक्तीची गरज नाही.शांततेच्या माध्यमातूनच शांतता निर्माण होईल. जे लोक विरोधात आहेत,त्यांना गोळ्या घालून शांतता निर्माण होणार नाही. तसेच,शांततेच्या विरोधातील लोकांनाही गोळ्या मारून शांतता निर्माण होणार नाही. युरोप आणि इतरत्र अनेक देश संपन्न झाले आहेत,गुन्हेगारीमुक्त झाले आहेत. पण, त्यांना असमानतेचा शाप आहे. असमानतेमुळे गती आणि चेतना कमी पडते.म्हणून समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळेही शांतता प्रस्थापित होईल.
‘आपण प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्नाने उत्तर मिळते आणि मानव विकासाची प्रक्रिया विकसित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या शांततेच्या मार्गाचा अवलंब केला आणि शस्त्रापेक्षा शास्त्राला महत्व दिले’, असेही असगर वजाहत यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले,’मेट्रो सारख्या भौतिक विकासाच्या गोष्टींकडे आपण लक्ष देत असलो तरी शिक्षणाच्या तरतुदीकडे लक्ष द्यावे लागेल. बौद्धिक परिवर्तन होणे महत्वाचे आहे,अन्यथा विकसित साधनांचा उपयोग होणार नाही.
‘साहित्य,कला,संगीत,काव्य,नाटक,कथाकथन,ग्रंथ लेखन ही सर्व विचाराला संवादाच्या माध्यमातून नेणारी प्रभावी माध्यमे आहेत. प्रेम आणि घृणा निर्माण करण्यासाठी ती वापरता येतात. पण,आपण मध्यम मार्ग शोधला पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे. भाषा वेगळ्या असतील पण मनुष्याचा मनुष्याशी संवाद होऊ शकतो. सर्व भावना,त्याग,प्रेम यांचा एकमेकांशी संवाद साधला जाऊ शकतो. हा सर्व संवाद कला आणि साहित्याच्या माध्यमातून होवू शकतो. मोठमोठ्या गोष्टी छोट्या शब्दातून मांडता येतात,हेच कला आणि साहित्याचे सामर्थ्य आहे’,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘डॉ बाबासाहेब आंबेडकर :महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत डॉ आंबेडकर यांचे मोठे बंधू बाळ दादा यांची भूमिका करणारा युवा कलाकार आदित्य बीडकर याचा सत्कार या कार्यक्रमात भारतीय संविधान, बुध्द आणि धम्मग्रथ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रमय गौरव ग्रंथ ,शाल,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रा.रतनलाल सोनाग्रा आदित्य बीडकर यांनी मनोगत व्यक्त केले, मिलिंद वाकोडे, देवानंद मेश्राम, चोरडिया, संध्या म्हस्के, पंचशिला दुर्गे, उज्वला मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते, प्रास्ताविक संजय मोरे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.