‘मानवतेची परंपरा पुढे न्यावी’ : अरुण गुजराथी
पुणे :
‘वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’ कोथरूड यांच्यातर्फे प. पु. डॉ. अचलऋषी म. सा. यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा (चादर प्रदान कार्यक्रम) शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला. ‘कोथरूड जैन श्रावक संघ’च्या पदाधिकार्यांनी हा सन्मान केला.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे झालेल्या कार्यक्रमात अरुण गुजराथी (महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष) आणि ‘जनसेवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. विनोद शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्य करणार्या माणिकचंद दुगड यांना ‘मानवरत्न’, भागचंद छाजेड यांना ‘आदर्श पिता’ तर नौपतलाल साकला यांना ‘दानभुषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करणार्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. अभय मुथा, डॉ. आशिष रानडे, डॉ. गुणवंत ओसवाल, डॉ. सतिश जैन, डॉ. सुजय लोढा, डॉ. श्रेयांस कपाले, डॉ.जयंतीलाल तलेसरा, डॉ. संतोष सिंघवी, डॉ. आनंद खिवंसरा, डॉ. जाधव आणि धरमचंद कोठारी यांचा या सन्मानात समावेश होता. अरुण गुजराथी (महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी अरुण गुजराथी म्हणाले,‘समाज जीवनातील प्रश्न सोडविताना मानवता महत्वाची आहे. जीवनात अहिंसा बाळगली पाहिजे. अपरिग्रहात समतेची बीजे असल्याने हा विचार अंगी बाळगला पाहिजे. भगवान महावीरांचा विचार जपण्यासाठी सर्वांनी मानवतावादी भावनेने कार्यरत रहावे. ’
डॉ. विनोद शहा म्हणाले, ‘अलिकडे डॉक्टर निव्वळ फायद्यासाठी काम करतात असा नागरिकांचा रोष असल्याने मारहाणीच्या घटना घडतात, या पार्श्वभूमीवर सेवाभावी काम करणार्या डॉक्टरांचा सन्मान करणे उल्लेखनीय आहे. ’
आमदार मेधा कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले आणि सहस्त्रचंद्र सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
‘वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’, कोथरूडचे अध्यक्ष रामलाल सिंघवी यांनी प्रास्ताविक केले तर किशोर गांधी यांनी आभार मानले. याप्रसंगी विजयकांत कोठारी, कुंदनमल दर्डा, सचिन लोढा, सुरेश मुनोत, हेमंत गांधी, अनील कटारिया, प्रकाश भंडारी, अशोकलाल नहार, संदीप चंगेडिया, साध्वी प.पु.वैभवश्रीजी आत्मा म.सा., साध्वी प.पु.चरमश्रीजी म.सा. उपस्थित होते.
कोथरूड येथील चातुर्मासमध्ये डॉ. अचलऋषी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ, अपंग आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे छत्रपती संभाजी विद्यालय, कोथरूड येथे आयोजन करण्यात आले होते. हे विद्यार्थी आणि पालकही कार्यक्रमाला उपस्थित होते.