पुणे :विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पी . परमेश्वरन लिखित ‘हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘ या मराठी अनुवादित ग्रंथसंचाचे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालेे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख डॉ . अनिरुद्ध देशपांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात २४ जुलै ,बुधवार,सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला . विवेकानंद केंद्र(कन्याकुमारी ) या संस्थेचे महाराष्ट्र प्रांत संचालक किरण कीर्तने ,विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर उपस्थित होते.डॉ. निरुपमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
पी .परमेश्वरन यांच्या गेल्या ५० वर्षातील साहित्याचा संपादित ग्रंथसंग्रह ‘हार्ट बीट्स ऑफ हिंदू नेशन ‘या नावाने इंग्रजीत प्रकाशित झाला असून हा ग्रंथ मराठीत 3 खंडात आला असून दत्ता पंचवाघ ,अरुण करमरकर ,भगवान दातार यांनी 3 खंडांचा भावानुवाद केला आहे . हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘हा भावानुवाद म्हणजे 3 खंडांचा संच आहे
विजय कुवळेकर म्हणाले, ‘पी. परमेश्वरन यांच्या ५० वर्षांचे साधनेचे प्रतिबिंब या ग्रंथसंचात पडलेले आहे. आपण हिंदू आहोत, म्हणजे काय आहोत, याची ओळख या ग्रंथसंचातून होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने अनेक मोठया गोष्टींचे परिशीलन परमेश्वरन यांनी केले आहे. हिंदू संस्कृतीचा प्रवाह हजारो वर्ष अखंड का राहिला, हे सहजपणे त्यांनी मांडले आहे.
जगातील अनेक चांगल्या विचारधारांचा, विचारवंताचा , त्यांच्या विचारांचा आढावाही परमेश्वरन यांनी घेतला आहे. आपला प्रकाश विसरुन परप्रकाशित होण्यातील धोके त्यांनी मांडले आहेत. हे खंड सर्व शिक्षण संस्थांमध्ये, युवकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.
इंग्रजांची शिक्षणपद्धती आपण स्वीकारलेली असली तरी भारतातील शिक्षण पध्दतीत भारतीयत्व, हिंदुत्व मांडण्याची गरज आहे. हिंदुत्व म्हटल्यावर मनं आक्रसण्याची गरज नाही. प्रतिगामी आणी पुरोगामी या शिक्क्यांच्या मध्ये आपण अडकलो आहोत. कृतक पुरोगामीपणा आपण रुजवला आहे. त्यापलिकडे जाऊन समाजाने पाहिले पाहिजे.
विवेकानंदांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडलो का , हेही तपासले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘ परमेश्वर यांची पुस्तके ही वैचारिक देणगी आहे. हिंदुत्वाचे विचार एक पक्षीय आहेत, असे मानण्याची सवय आतापर्यंत होती.आजही पाश्चात्यांच्या चिंतनावरील आपले प्रेम कमी झालेले नाही. हिंदुत्व ही स्वाभाविक स्वयंसिद्ध अभिव्यक्ती आहे. कितीही अभारतीय चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. संघर्षाच्या उंबरठ्यावरील जगाला संदेश देण्याची क्षमता हिंदू तत्वज्ञानात आहे. त्यावर टीका करण्यात खूप वेळ गेला. आता हे तत्वज्ञान आत्मसात करण्याची वेळ आहे. त्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतील या पुस्तकांमधील सर्व चिंतन परमेश्वरन यांनी समाजात राहून केले आहे.
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेंद्र बोरकर यांनी आभार मानले.

