पुणे :ग्रामीण भागातील स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेऊन रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या सदस्यांनी १४ हून अधिक गावांमध्ये स्वच्छ पाण्याचे प्रकल्प उभारून तहान भागविण्याचे काम केले आहे .’अमृतधारा ‘प्रकल्पाद्वारे ‘वॉटर एटीएम ‘ या फिल्टर आर ओ प्लांट उभारणीतून ६ गावांची स्वच्छ पाण्याची गरज रोटरीने भागवली तर ‘ अमृत कुंड ‘ प्रकल्पाद्वारे डोंगराळ भागातील झऱ्याचे पाणी टाकीतून उपलब्ध करून ८ गावांची तहान रोटरीने भागवली आहे .
रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
होतले (तालुका मुळशी),बुचकेवाडी (पाथर्डी),नसरापूर(पुणे ),आटपाडी (सांगली) यासारख्या ६ गावात गावात हे स्वच्छ पाण्याचे आर ओ प्लँट ‘अमृतधारा ‘प्रकल्पाद्वारे उभारण्यात आले आहेत.आर ओ फिल्टर प्लांटद्वारे प्रत्येक गावात दररोज ४ हजार लिटर पाणी शुद्ध करण्याचे काम होत आहे. गावकऱ्यांसाठी वॉटर एटीएम कार्ड तयार करून दिले असून वापराची नोंद त्यावर होते.त्या नोंदीद्वारे गावकऱ्यांकडून वर्गणी स्वरूपात पैसे गोळा केले जातात. गावातील गावकऱ्यांनाच प्रशिक्षण देऊन वर्गणी ,प्रकल्प देखभाल प्रशिक्षण ही कामे केली जातात. पूर्वी नदीचे पाणी ही गावे पित होती. बोअरवेल मुळे क्षारयुक्त पाणी येते. ७० टक्के आजार हे अशुद्ध पिण्याच्या पाण्याने होतात. त्यामुळे ग्रामीण भागात शुद्ध पाण्यासाठी प्लांट उभारण्यात आले ते टाळण्यासाठी आरओ प्लांट चा पर्याय निवडण्यात आल्याचे सतीश खाडे यांनी सांगितले. ५ रुपयाला २० लिटर याप्रमाणे पाणी गावकऱ्यांना या प्रकल्पातून मिळते.अशोक भंडारी (रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड) यांच्यासह अनेकांची या प्रकल्पात मदत झाली.प्रत्येक प्रकल्पासाठी अडीच लाख रुपये खर्च रोटरी क्लबने केले आहेत.
‘अमृत कुंड’ या अनोख्या संकल्पनेद्वारे डोंगराळ भागातील टंचाईग्रस्त गावात टाकी बांधून आणि जलवाहिनीद्वारे गावात गुरुत्वाकर्षणाने पाणी आणणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.आणखी ८ गावात हे प्लांट उभारण्यात येणार आहेत .
डोंगराळ भागात झऱ्याचे पाणी आणण्यासाठी महिलांचा अर्धा दिवस जात असे .५ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. फेब्रुवारी ते जून या काळात पाणीटंचाई निर्माण होत असे.त्यावर उपाय म्हणून रोटरी सदस्यांनी’अमृतकुंड ‘प्रकल्पाची रचना केली.
‘कुंड ‘प्रकल्पात डोंगरात झऱ्याजवळ फेरोक्रीट सिमेंटची १२ हजार लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येते. जलवाहिनीद्वारे ते पाणी गावाजवळ दुसऱ्या टाकीत सोडले जाते.भोर तालुक्यात वरोडी,धानवली,कोरले,कोवी,आणि मुळशी तालुक्यात सुसले,गोरे वस्ती,कातकरी वस्ती अशा एकूण ८ गावात कुंड प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील चार गावांना रोटरीने ७ लाख ४० हजार खर्च केला. मजुरी पोटी गावचा अडीच लाख रुपये खर्च आला. आता पुढील १० गावांचे काम २५ लाख ३० हजार रुपयात होत आहे.
सिंजेंटा कंपनीने त्यांच्या सीएसआर निधीतून काही निधी दिला आणि रोटरी क्लबने उर्वरित निधी जमवून हे प्रकल्प पूर्ण केले. गावकऱ्यांनी श्रमदान केले. त्यामुळे विनामूल्य पाणी गावकऱ्यांना मिळू लागले आहे. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीमध्ये सिंजेंटा कंपनीचे संजीव रस्तोगी,अमानोरा क्लब ‘चे इंदर सिंघी,भोर -रायगड रोटरी क्लब ‘चे विनय कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
आगामी ५ वर्षात पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील सर्व वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याची सोय’अमृत कुंड’प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी मदत उभी केली जाणार आहे,’असे सतीश खाडे यांनी सांगितले.