शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध उभे रहा :अनिल सद्गोपाल
पुणे :शिक्षण हे परिवर्तन आणि सामाजिक विकासाचे साधन उरले नाही तर अर्थव्यवस्थेचे गुलाम निर्माण करणारे साधन बनले असल्याने आणि त्यातून वर्णवर्चस्ववादी ,फॅसिस्ट विचार लादले जात असल्याने शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध उभे राहण्याची वेळ आली आहे ‘असे प्रतिपादन एकलव्य संस्थेचे संस्थापक अनिल सद्गोपाल यांनी केले .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘आयोजित गांधी सप्ताहानिमित्त ‘शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि उपाय ‘ या विषयावर ते बोलत होते . गांधी भवन येथे मंगळवारी सायंकाळी हे व्याख्यान झाले .
अनिल सद्गोपाल म्हणाले ,’ शिक्षणाला भारतात मोठा सामाजिक प्रगतीचा आणि ध्येय्यवादाचा इतिहास आहे . १९८६ नंतर जागतिक दबावाखाली शिक्षणावरील खर्च कमी करून खासगीकरणाचे दरवाजे उघडण्यात आले . शिक्षण व्यवस्था त्यामुळे व्यवसाय बनली आहे . शिक्षण हे देशस्थिती शी नाते सांगणारे परिवर्तनाचे साधन होते . ते आता अर्थव्यवस्थेला अपेक्षित गुलाम निर्माण करणारे साधन झाले आहे . शिक्षण क्षेत्रावर आणि त्यातील चारित्र्यावर आता खासगी आणि आंतरराष्ट्रीय शक्तींचा अंकुश राहणार आहे . यातून रोजगार विहीन अर्थव्यवस्था उभी राहत असून कोणतेही सरकार रोजगार देऊ शकत नाही .
सध्याचे सरकार शिक्षणाच्या नावाखाली फॅसिस्ट ,वर्णवर्चस्ववादी विचार शिक्षण क्षेत्रावर लादत असून प्रश्न विचारणाऱ्यांना देश द्रोही ठरवले जात आहे . शिक्षणाच्या खासगीकरणाचा आणि बाजारीकरणाच्या धोका आपण समजू शकलो नाही तर ऐतिहासिक चूक होणार आहे .
डॉ कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते . संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी अन्वर राजन ,डॉ उर्मिला सप्तर्षी इत्यादी उपस्थित होते