प्लास्टिक उत्पादक ,वापरकर्ता ,संस्था ,उद्योग आणि सरकारी प्रयत्नांचे सुसूत्रीकरण करणार
पुणे :’प्लास्टिक, ई -वेस्ट निवारण कृती अभियान ‘ चा कृती कार्यक्रम आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला . प्लास्टिक उत्पादक ,वापरकर्ता ,सामाजिक संस्था ,उद्योगांच्या सीएसआर योजना आणि सरकारी प्रयत्नांचे सुसूत्रीकरण करणार असल्याची आणि दूरगामी कामातून प्लास्टिक कचरा समस्येवर उपयोगी ठरणारे नवे प्रारूप (मॉडेल ) उभारणार असल्याचे माहिती या वेळी देण्यात आली .
सामाजिक संस्था -कार्यकर्त्यांच्या या मंचातर्फे कचरा ,प्लास्टिक समस्येवर कृती कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात सोमवार दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
अनंत घरत (‘माय अर्थ’ ) , ललीत राठी ( कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ ),नीलेश इनामदार (‘एन्व्हायरॉन्मेंटल क्लब ऑफ इंडिया) ,संध्या बोमण्णा (भरारी प्रतिष्ठान) ,सचिन निवंगुणे (रिटेल व्यापारी असोसिएशन ),दत्तात्रय देवळे (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अधिकारी )अशा अनेक संस्थांचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते . प्लास्टिक संकलन ते प्रक्रिया ,उत्पादक -संकलक ते उपभोक्ता अशी प्लास्टिक कचरा विषयक साखळीमध्ये सूत्रबद्ध काम करण्याचे नियोजन या मंचाने केले आहे .
या सर्व कृती कार्यक्रमात प्रशिक्षण,जनजागृती वर देखील भर देण्यात येणार असून महिला बचत गट ,मंडळे ,सामाजिक संस्था ,सोसायट्याना बरोबर घेण्यात येणार आहे .प्रशिक्षण ,जनजागृतीसाठी विविध माध्यमे ,साधनांची निर्मिती या मंचाद्वारे केली जाणार आहे . पहिला प्रशिक्षण कार्यक्रम १६ मार्च रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र (दत्तवाडी ) येथे होणार आहे ,तर १ मे कामगार दिनी कचरावेचक ,स्वच्छतासेवकांचा सन्मान करण्यासाठी ‘पर्यावरण रक्षक दिन ‘ साजरा केला जाणार आहे .
टाकाऊ प्लास्टिक ला हमीभाव देण्याचा भारतातील पहिला प्रयत्न या मंचाद्वारे केला जाणार आहे ,अशी घोषणाही या पत्रकार परिषदेत करण्यात आली . हमीभाव मिळाल्यास प्लास्टिक वर्गीकरण आणि संकलन करणाऱ्या स्वच्छता सेवकांना प्रोत्साहन मिळणार आहे .