बाराव्या अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : ‘ दलितांच्या लेखणीवर अन्याय झाला, तसाच मुस्लिम लेखणीवरही झाला. पण, लेखणीवरचा अन्याय फार काळ टिकत नाही, हेच सिध्द झाले आहे.मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाने पुनरूज्जीवनाचे काम करावे. भाषेला पुढे न्यावे. तेच राष्ट्रीय कार्य ठरेल. ‘ असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सायंकाळी केले.
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित बाराव्या अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचा समारोप ६ जानेवारी ,सायंकाळी पाच वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरी (आझम कॅम्पस ) येथे झाला .
यावेळी श्री. शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, ‘डॉ.पी. ए. इनामदार यांनी नवे नेतृत्व घडवणारी, नवी पिढी शिक्षण कार्यातून उभी केली आहे. आणि आता संमेलनाच्या निमित्ताने साहित्याला, लेखकांना बळ देण्याचे काम ते करीत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे.
दिवंगत मुस्लीम साहित्यिक फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या लेखनाचा गौरव करुन शिंदे म्हणाले, त्यांचे पुरोगामी विचार तेव्हा काहींना पटले नसतील. पण,पुढील काळात आणखी पटायला लागतील, कारण काळ बदलेल तसे धर्माचे विवेचन बदलत जाते.
आपण भारतात जन्माला आलो आहोत, तर इथल्या भाषा, संस्कृती समजून घेऊन अल्पसंख्य समाजात डॉ.रफिक झकेरिया यांच्यासारखे अनेक विचारवंत निर्माण झाले. पण, त्यांचे मोठेपण वेळेत आम्हाला कळाले नाही.
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, ‘ मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाला जागा आणि निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करेन.आझम कॅम्पस ला आमदार निधीतून ११ संगणक आणि अल्पसंख्याक मंत्रालयाकडून ५० संगणक देऊ असेही त्यांनी सांगीतले.
६ परिसंवाद, २ कवि संमेलने, २ एकांकिका, १ मुशायरा अशी रेलचेल या संमेलनात ३ दिवस होती.
ए.के. शेख यांनी संमेलनातील ठराव वाचून दाखवले. पुण्यात मुस्लीम मराठी साहित्यविषयक घडामोडींसाठी ‘साहित्य भवन ‘ उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
लीळा चरित्र ‘ च्या निमित्ताने मराठी साहित्याचा पहिला शब्द जिथे उमटला त्या रिध्दपूर येथे मराठी विद्यापीठ व्हावे, सच्चर समिती शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, अ.भा. मुस्लीम साहित्य संमेलनाला अनुदान मिळावे, साहित्य भवनासाठी शासकीय जमिन मिळावी, साहित्य मंडळावर मुस्लीम साहित्यिकांचीही नेमणूक व्हावी, मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे मुखपत्र ‘ काफिला ‘ साठी अनुदान मिळावे, मुस्लीम साहित्याला अभ्यासक्रमात स्थान मिळावे , मॉब लिंचिंग मध्ये जे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी असे ठराव मंजूर करण्यात आले.
सुशीलकुमार शिंदे, दिलीप कांबळे यांच्या हस्ते साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला.
स्वागताध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ डॉ.आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे १९५० नंतर सर्व समाजघटकाची प्रगती झाली.आता तरीही कोणी नकारात्मक बोलत असेल तर गुन्हा आहे. हा सकारात्मक दृष्टीकोण पेरण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे ओढा वाढत असताना मराठी, उर्दू भाषांना ताकद देण्यासाठी तळागाळातील घटकांनाच काम करावे लागणार आहे. त्यात नव्या तंत्र स्नेही दृष्टीकोणाने , कालानुरूप मदत आम्ही करू.
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी ही मनोगत व्यक्त केले.
महबूब काझी यांनी सूत्रसंचालन केले.लतीफ मगदूम यांनी आभार मानले.