पुणे ः‘पुणेकरांनी पुणेकरांवर काढलेला दिवाळी अंक’ अशी ख्याती असलेल्या ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे तसेच राम दहाळ, प्रशांत गणपुले, चिंतू पवार, चैतन्य खरे यांना ‘पुण्यभूषण 2017’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा मान देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात या अंकाचे प्रकाशन होणार असून, ‘प्रवीण मसाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया, कमला चोरडिया, अशोक गोडसे (श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष ), महेश सूर्यवंशी (कोषाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती या प्रकाशन कार्यक्रमाला असणार आहे.
मागील वर्षी सिटी पोस्ट ऑफिसमध्ये प्रकाशन समारंभ झाला होता. दिवाळी अंकाचे वितरण पोस्टाद्वारे करणार्या पोस्टमन काकांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. त्यापूर्वी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या ‘पक्क्या’ पुणेकरांच्या हस्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. प्रकाशन समारंभातील कल्पकता राखत आणि गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वषार्र्चे औचित्य साधून यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘पुण्यभूषण 2017’ दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे.
पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुणेकरांनी पुणेकरांसाठी ’दिवाळी अंक’ काढण्याची संकल्पना ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ने प्रत्यक्षात आणली. या अंकाला दरवर्षी दर्जेदार अंकांसाठी अनेक पारितोषिके मिळत असतात, अशी माहिती डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

