पुणे दि, 28 : ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. वन्यजीवाविषयी अधिक प्रमाणात जनजागृती होण्याच्या उद्देशाने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे 1ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डॉ.दिनेश त्यागी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) के.पी.सिंग, उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) नेचरवॉक चॅरिटेबल ट्रस्टचे पुष्कर चौबळ, बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर, अनुज खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राजस्थान येथील सरिस्का व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गोविंदसागर भारद्वाज यांचे “वन्यप्राणी व अधिवास संवर्धन ” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा अधिकाधिक वन्यजीव प्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय वनाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.