मानसी बडवे यांच्या कीर्तनाद्वारे ‘विश्व बंधुत्वाचा संदेश’
पुणे : ‘भारतीय संस्कृती विश्व् बंधुत्वावर आधारित आहे. या संस्कृतीचा कणा १२ व्या दशकात ज्ञानेश्वर यांनी ‘हे विश्वची माझे घर’ या ओवीद्वारे मांडला. विश्वामधील परस्परांविषयी विश्वास निर्माण करणे, जाती-धर्म बाजूला सोडून एकत्र आले पाहिजे, हा विषय ज्ञानेश्वर आणि स्वामी विवेकानंद यांनी मांडला’, असा ‘विश्व बंधुत्वाचा संदेश’ ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखा च्या वतीने आयोजित कीर्तनात मानसी बडवे यांनी दिला.
प्रसिद्ध युवा कीर्तनकार मानसी बडवे यांनी हे कीर्तन सादर केले. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता टिळक स्मारक मंदीर, सदाशिव पेठ येथे झाला. या कीर्तनाला तरुणाईची उपस्थिती लक्षवेधी होती.
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या प्रसिद्ध भाषणाला १२५ वर्ष झाल्याचे औचित्य साधून ‘विवेकानंद केंद्र ‘ कन्याकुमारी तर्फे ‘विश्वबंधुत्व दिन ‘ साजरा करण्यात आला.
टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत संघटक विश्वास लपालकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘स्वामी विवेकानंद यांना योद्धा संन्यासी संबोधिले जाते. त्यांनी आपल्या विचारांनी मन: परिवर्तन घडवून आणले. समोरचा वाईट वागत असेल तर त्याला न संपवता त्याच्यातील वाईटपणाला संपविणे हा हिंदू धर्म संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी हा संदेश पसायदानातून ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ या ओवीतून समाजासमोर आणला. तोच संदेश स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या सुरुवातीला ‘माय ब्रदर्स अँड सिस्टर्स’ म्हणून मांडला होता. आज या भाषांची १२५ वर्ष पूर्ती आहे.
हा विषय पूर्वरंगात आर्या, साकी दिंडीद्वारे मानसी बडवे यांनी सादर केला. उत्तर रंगात नरेंद्र ते विवेकानंद प्रवास कथा रूपाने मांडला. तबल्यावर मंदार गोखले तर हार्मोनियम कौस्तुभ परांजपे यांनी साथसंगत केली.
‘राम कृष्ण हरी’, ‘अवघाचि संसार सुखाचा करेन’ अशी पदेही त्यांनी यावेळी सादर केली.
विवेकानंद केंद्र ,पुणे नगरचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद माने यांनी केले. सौ.केतकी फडके यांनी प्रास्ताविक केले.