पुणे :विक्रम पेंढारकर प्रस्तुत सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गीत रामायण’ कार्यक्रमाने ‘भारतीय विद्या भवन’ मधील श्रोते मंत्रमुग्ध झाले.
वर्धन पेंढारकर आणि अथर्व बुरसे या किशोरवयीन गायकांनी गीत रामायणातील निवडक गीते सादर करून गदिमा आणि बाबूजींना स्वरांची मानवंदना दिली. कार्यक्रम रसिकांना रामायणाचे दर्शन देणारा ठरला
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्धन पेंढारकर, अथर्व बुरसे यांना मैत्रेयी पेंढारकर आणि वैशाली जोशी साथ दिली. तर विक्रम पेंढारकर ( हार्मोनियम ), प्रसाद वैद्य (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्ये), चारूशीला गोसावी (व्हायोलिन) यांनी वाद्यवृंदावर साथसंगत केली.’भारतीय विद्या भवन ‘ चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५३वा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 24 ऑगस्ट 2018 रोजी ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी ६ वाजता झाला.
रामायणातील महत्वाचे प्रसंग गीतांच्या माध्यमातून सादर करत रामायण उलगडले. या कार्यक्रमांतर्गत ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’, ‘शरयू तीरावर अयोध्या’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे ‘, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘नकोस नौके’, ‘शेवटी करिता नम्र प्रणाम’ , ‘दैवजात दुःखे भरता’ , ‘साक्षीस व्योम पृथ्वी’, ‘लीलया उडुनी गगनात’, ‘सेतू बांधा रे सागरी’, ‘त्रिवार जयजयकार’ , ‘गा बाळांनो श्री रामायण’ या गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
‘सेतू बांधा रे सागरी’ हे गीत सादर करताच रसिकश्रोत्यांनी टाळय़ांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे निवेदन वैशाली जोशी यांनी केले.

