कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ‘ सडक से संसद ‘ लडाई
इंटक ‘ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांची पत्रकार परिषदेत घोषणा
पुणे :कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ‘ सडक से संसद ‘ लढा दिला जाणार असल्याची घोषणा ( राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस ) ‘इंटक ‘ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र प्रदेश इंटक ची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर आगामी कृती कार्यक्रमाची माहिती पत्रकार संघात देण्यात आली.
डॉ. अशोक चौधरी म्हणाले, ‘ कामगारांना न्याय देण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बेरोजगारी वाढली आहे. कारखाने बंद होऊन कामगारांना गावी जाऊन मजुरी करावी लागत आहे, त्यामुळेच मनरेगा मध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे.
कामगारांच्या मागण्यासाठी इंटक सडक से संसद ‘ लढा देणार आहे. त्याचा भाग म्हणून आगस्टमध्ये मुंबईत कामगार अधिवेशन आयोजित केली जाणार आहे.
मोदी सरकारला कामगार विषयक ४४ कायदे कमी करून त्यांची संख्या ४ वर आणायची आहे. त्यामुळे कामगारांचा आवाज दाबला जाणार आहे. याला आमचा विरोध आहे. मजूराला प्रतिदिन किमान ५०० रुपये मजूरी दिली जावी अशी आमची मागणी आहे. कामगार, मजुरांचे काम कायमस्वरूपी व्हावे, असंघटित कामगार क्षेत्राला ५ हजार प्रतिमहिना पेन्शन मिळावी, संघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना २ हजार रुपये पेन्शन मिळावी, अशी आमची मागणी आहे. काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क व्हावा यासाठी आम्ही लढू. तसेच केंद्राच्या निर्गुतवणूक धोरणास आमचा विरोध राहील.असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशीही मागणी आहे.
१९४७ मध्ये स्थापन झालेल्या इंटकचे देशभरात ५ कोटी सदस्य झाले असून संजीव रेड्डी यांच्यासारखे काही जण त्यांचीच इंटक अधिकृत असल्याचे सांगतात. मात्र,खरी इंटक आमची असून ती म. गांधी,वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केली आहे. २००७ ला यांच नावाची संघटना स्थापन करुन संजीव रेड्डी हे गृहस्थ त्यांची इंटक अधिकृत असल्याचे सांगत फिरत आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. रेडडी यांना इंटक नाव वापरण्यास श्रम मंत्रालयाने मज्जाव केला आहे.या पत्रकार परिषदेला प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, प्रदेश सरचिटणीस पराग आठवले ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तेजंदरसिंग अहलूवालिया, उपस्थित होते