पुणे :’किल्ले केवळ ऐतिहासिक महत्वाची स्थळे नाहीत, तर पाणी- वनसंपदा, जैववैविध्य देणारी भौगोलिक , जैविक महत्वाची केंद्रे आहेत, त्यामुळे गडसंवर्धनाचा, सुशोभीकरणाचा विचार करताना जैववैविध्याला धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी’, असे प्रतिपादन ‘बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या धोरण विभागाचे सहसंचालक डॉ. राहुल मुंगीकर यांनी केले.
‘जीविधा’ आयोजित आठव्या हिरवाई महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी इंद्रधनुष्य सभागृह येथे झाला.
डॉ. मुंगीकर म्हणाले, ‘महाराष्ट्राला ६० टक्के पाणी हे पश्चिम घाटातून, किल्ले भागातून मिळते. तिथल्या इतिहासाबरोबर भूगोल आणि पर्यावरणालाही समजून घेतले पाहिजे. तसे समजून न घेता गड संवर्धनाची आधुनिक कामे करणे योग्य ठरणार नाही. गड संवर्धनासाठी एकात्मिक दृष्टीकोण बाळगावा लागेल.
किल्ल्याच्या बुरुजात, भिंतीमधील वड- पिंपळाची झाडे काढली तर या बुरुजांना धरून ठेवणाऱ्या मुळया सैल होऊन बुरुज लवकर ढासळतील. उंच किल्ल्याच्या प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात दगडांना धरून ठेवणारे दुसरे कोणतेही ताकदवान, परवडणारे सिमेंट मटेरियल उपलब्ध नाही.
किल्ल्याजवळच्या पठारावरील, कपारीजवळील गवताळ प्रदेश माती धरून ठेवत असल्याने तिथे वनीकरण करण्याचा आग्रह धरू नये. गवताळ प्रदेशावर अवलंबून असलेली जीवसाखळी धोक्यात येते.
‘महाराष्ट्राची किल्ल्यांची साखळी ही वन्य श्वापदांचे कॉरिडॉर आहेत, ते नष्ट होता काम नयेत.
किल्ला आणि किल्ल्याचा परिसर, तेथील वनसंपदा, उपयोग याचे ज्ञान स्थानिक व्यक्तींना असल्याने त्यांच्या सूचना विचारात घेतल्याशिवाय गड संवर्धन करून चालणार नाही.
गडांच्या परिसरात स्थानिक वृक्ष लावले जावेत. दूध -दुभते देणारे गवताळ प्रदेश नष्ट केले जाऊ नयेत. अन्यथा माती सरकण्याची माळीणसारखी दुर्घटना होण्याची शक्यता वाढते’, असेही डॉ. मुंगीकर यांनी सांगितले.’
‘ निसर्ग सेवक ‘ चे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांच्या हस्ते रामकृष्ण आडकर, प्रीती कोरे, डॉ. विनया घाटे यांच्या ‘सातारा जिल्ह्यातील देवराया’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सचिन पुणेकर, निवेदिता जोशी, आदी मान्यवर होते.