पुणे ःपुणेकर जनतेचे हित डावलणार नाही असा सूर ‘पार्किंग पॉलिसी ‘ या विषयावरील सर्वपक्षीय महाचर्चेतउमटला .
‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘पार्किंग पॉलिसी’ या गाजत असलेल्या विषयावर सर्वपक्षीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .
‘पुणे महानगर परिषद’चे निमंत्रक अॅड. गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक केले .
या चर्चासत्राला पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, शहराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी व तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते . माजी महापौर अंकुश काकडे ,योगेश गोगावले ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,माजी महापौर प्रशांत जगताप ,श्रीनाथ भिमाले ,चंद्रकांत मोकाटे ,अरविंद शिंदे ,वसंत मोरे ,संजय भोसले ,रुपाली ठोंबरे ,प्रांजली देशपांडे ,संतोष शिंदे हे सहभागी झाले . ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी सूत्रसंचालन केले . महेश महाले यांनी आभार मानले .
चर्चासत्राच्या संयोजन समितीमध्ये महेश महाले, संतोष पाटील, योगेश खैरे, किरण बराटे, संजय दिवेकर, अनिरुद्ध खांडेकर, दत्तात्रय जगताप, केदार कोडोलीकर, अॅड. राजेश तोंडे यांचा समावेश होता .
‘पुणे शहर आता विस्तारले आहे, त्यात ग्रामपंचायती, पीएमआरडीएमुळे जिल्हाही समाविष्ट झाला आहे. या विस्तारित भागाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, मांडण्यासाठी एकत्रित संवाद करता येणार्या व्यासपीठाची आवश्यकता होती, म्हणून पुणे महानगरपरिषद या व्यासपीठाची निर्मिती करण्यात येत आहे. हे व्यासपीठ अराजकीय आहे,’ असे अॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.
संस्थेच्या लोगोचे अनावरण या कार्यक्रमात ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी इंडिया लिमिटेड) चे संस्थापक हणमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले .
सुरुवातीला आय . टी . डी . पी . संस्थेच्या प्रांजली देशपांडे यांनी पार्किंग पॉलिसीची माहिती दिली . वाहने प्रचंड वाढत असल्याने पादचारी धोरण ,सायकल प्लॅन आणि पार्किंग पॉलिसी अमलात आणण्याची गरज आहे . पार्किंग साठी कमीत कमी मोबदला दिला जावा असा प्रयत्न आहे .
योगेश गोगावले म्हणाले ,’प्रशासनाने त्यांच्या अधिकारात मांडलेल्या प्रस्तावात पुणेकरांच्या हितासाठीच भाजपने उपसूचनेद्वारे बदल केला . आम्ही पुणेकरांना जाचक होणारे पार्किंग कर ऐवजी सार्वजनिक वाहतूक धोरणावर लक्ष देत आहोत . विधानसभा क्षेत्रनिहाय नागरिकांच्या सूचना मागविण्याची आणि सर्वपक्षीय समितीत चर्चा करण्याची भाजपाची तयारी आहे .सीसीटीव्ही सारख्या माध्यमातून पार्किंग व्यवस्था पाहू ,माफियाराज ला पाठिंबा देणार नाही .
‘श्रीनाथ भीमाले म्हणाले ,’पार्किंग शुल्क आधुनिक तंत्रज्ञानाने पारदर्शक रित्या निश्चित होईल आणि अनुभवीना त्याचा ठेका दिला जाईल . तज्ज्ञ ,गटनेते ,महापौर आणि वाहतूक पोलिसांचा अभिप्राय पार्किंग पॉलिसी आणताना घेतला गेला ,जिथे पुणेकरांना त्रास होईल ,अडचण होईल ,त्याचे निराकरण केले जाईल
सिद्धार्थ धेंडे म्हणाले ,’२००९ पासून पार्किंग पॉलिसी चा विचार होत होता ,तो आता अमलात येत आहे ,कारण लोकसंख्येपेक्षा वाहने जास्त झाली आहेत . झोपडपट्टी तील गोरगरिबांना हे शुल्क परवडणार नाही म्हणून ते वगळले ‘
अंकुश काकडे म्हणाले ,’पार्किंग साठी शुल्क घेतले म्हणजे वाहने कमी होणार नाहीत . सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा उपाय आहे ‘
प्रशांत जगताप म्हणाले ,’पीएमपीएमएल साठी आम्ही ११०० बसेस दिल्या . अजून ३ हजार बसेस ची आवश्यकता आहे . आमचा पार्किंग पॉलिसीला विरोध आहे ‘
अरविंद शिंदे म्हणाले ,’रात्रीत पार्किंग पॉलिसी मंजूर करण्यात आली कारण अंधारात पाप केले जाते . पार्किंग ची भाजपला इतकी काळजी आहे ,तर मित्रमंडळ चौकातील पार्किंग लॉट रद्द का केला .
‘मागच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले हे सांगू नका ,तर आताचे सत्ताधारी काय करताहेत हे सांगा. गटनेत्यांना डावलून पार्किंग पॉलिसीचा निर्णय झाला ‘असा आरोप वसंत मोरे यांनी केला .
जप्त गाड्यांची ,पार्किंग मधील गाड्यांची पालिका जबाबदारी घेणार का ? असा प्रश्न चंद्रकांत मोकाटे यांनी विचारला . शिवसेनेचा या पॉलिसी ला विरोध असल्याचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले .
पार्किंग पॉलिसी हा तुघलकी निर्णय असल्याची टीका संतोष शिंदे यांनी केली

