पुणे-‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘पार्किंग पॉलिसी’ या गाजत असलेल्या विषयावर सर्वपक्षीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 30 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता हे चर्चासत्र शनिवार वाडा पटांगण येथे होणार आहे. ‘पुणे महानगर परिषद’चे निमंत्रक अॅड. गणेश सातपुते यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या चर्चासत्राला पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, शहराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी व तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ‘पुणे शहर आता विस्तारले आहे, त्यात ग्रामपंचायती, पीएमआरडीएमुळे जिल्हाही समाविष्ट झाला आहे. या विस्तारित भागाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, मांडण्यासाठी एकत्रित संवाद करता येणार्या व्यासपीठाची आवश्यकता होती, म्हणून पुणे महानगरपरिषद या व्यासपीठाची निर्मिती करण्यात येत आहे. हे व्यासपीठ अराजकीय आहे,’ असे अॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.
संस्थेच्या लोगोचे अनावरण या कार्यक्रमात ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी इंडिया लिमिटेड) चे संस्थापक हणमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
चर्चासत्राच्या संयोजन समितीमध्ये महेश महाले, संतोष पाटील, योगेश खैरे, किरण बराटे, संजय दिवेकर, अनिरुद्ध खांडेकर, दत्तात्रय जगताप, केदार कोडोलीकर, अॅड. राजेश तोंडे यांचा समावेश आहे.