पुणे :
“डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्यास पाहून आम्ही संस्थेत कार्यरत झालो, त्यांना पाहून जागेवरून आदरयुक्त उठायची सवय होती, आज मात्र श्रद्धांजलीसाठी उठून उभे राहण्याची वेळ आली, हे कल्पनेपालिकडचे दुर्दैव आहे.’ अशा शब्दात “भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड आंत्रप्रुरशीप डेव्हलपमेंट’चे संचालक आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी आज श्रद्धांजली अर्पण केली.
“आयएमईडी’मध्ये सोमवारी सकाळी डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.’ त्यावेळी डॉ. वेर्णेकर बोलत होते.
“डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन जगभर गेले. हे मोठे शैक्षणिक कार्य आहे. भारती विद्यापीठात सर्वधर्मीय, अध्यापक काम करतात आणि सर्व प्रांतातील विद्यार्थी शिक्षण घेतात, हा व्यापक दृष्टीकोण डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे तयार झाला,’ असेही डॉ. वेर्णेकर यावेळी बोलताना म्हणाले.
डॉ. सचिन वेर्णेकर म्हणाले, “भारती विद्यापीठाचा दिल्ली कॅम्पस सांभाळण्याची कामगिरी 11 वर्षे माझ्यावर सोपविण्यात आली. या सर्व काळात डॉ. पतंगराव कदम यांची नेतृत्वशैली आणि व्यक्तिमत्त्व अभ्यासता आले.
आयएमईडी पौड रस्ता येथे झालेल्या श्रद्धांजली सभेवेळी एमबीए, एमसीएचे प्राध्यापक, विद्यार्थी, सेवक वर्ग उपस्थित होते.’