पुणे :मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला. तरीही त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला 30 वर्षे लागली, आणि हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू, पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी आज व्यक्त केली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान आझम कॅम्पसच्या डॉ. ए.आर.शेख असेंब्ली हॉलमध्ये गुरूवारी सकाळी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार होते. व्यासपीठावर आबेदा इनामदार, लतिफ मगदूम उपस्थित होते.
यावेळी बख्त यांचा सन्मान डॉ. इनामदार यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन करण्यात आला
फिरोज बख्त म्हणाले, ‘मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. भारतरत्न आझाद यांनी च भारतरत्न निवड समितीवर असल्याने त्याचा स्वीकार करणे अनुचित समजून नाकारला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि कलकत्त्याला त्यांच्या घरी पाठवून देण्यात आला. मौलाना आझाद यांचा यथोचित सन्मान झाला नाही’, याची खंत वाटते.
‘मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाही. त्यांच्यावरील लिखाण, त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याची व्यवस्था जनतेला माहिती करण्यात हेळसांड झाली’, अशी उदाहरणेही त्यांनी दिली.
‘इस्लामला स्वत:ची वेगळी संस्कृती नाही, तर ज्या मातीत इस्लाम जातो तिथली संस्कृती आपलेसे करतो, इस्लाम खर्या अर्थाने ‘कॉस्मॉपॉलिटन’ आहे’, असे मौलाना अबुल कलाम आझाद म्हणत, याची आठवण फिरोज बख्त अहमद यांनी करून दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.पी.ए.इनामदार म्हणाले, ‘द्वीराष्ट्र वादाच्या संकल्पनेमुळे देशाचे, विशेषत: मुस्लीमांचे अधिक नुकसान झाले. फाळणीची चूक दुरूस्त करून आपल्याला ‘अखंड भारत’ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवावे लागेल.’
‘5 हजार वर्षात भारताची जेवढी प्रगती झाली नाही,त्यापेक्षा जास्त प्रगती स्वातंत्र्योत्तर काळाच्या 70 वर्षात झाली. त्यात शिक्षणक्षेत्रात मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. केंद्रीय विद्यापीठ आयोगासारख्या संस्था ही त्यांनी दिलेली देणगी म्हणावी लागेल.’ असे डॉ. इनामदार यांनी सांगीतले
अभ्यासक सलीम चिश्ती,अनीता बेलापूरकर, मुमताझ सय्यद, रिझवाना शेख इत्यादी उपस्थित होते.

