पुणे : ‘आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन ला निसर्गकवी म्हटले जात असले तरी त्यांनी निसर्गाची प्रलयंकारी रूपेही काव्यातून मांडली. इंग्लंडमधील काव्यबहारीचा काळ त्यांनी आणखी समृद्ध केला,’ असे प्रतिपादन मॉडर्न महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी केले.
‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित ‘एक कवी – एक भाषा’ उपक्रमातील ५३ व्या व्याख्यानमालेदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी ‘ रसिक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला उपस्थित होते.
‘पुणे श्रमिक पत्रकार भवन’ येथे हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी झाला. या दृकश्राव्य व्याख्यानाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ‘आल्फ्रेड टेनिसनच्या वेळचा काळ हा काव्याच्या दृष्टीने बहारीचा होता. व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये समृद्धी होती आणि वैचारिक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारांना ऐकले जात होते. अशा काळात निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिसन यांनी निसर्गाची प्रलयंकारी रूपेही कवितेतून मांडली. ‘इन मेमोरियम’, ‘बेटर टू हॅव लव्ह्ड’, ‘होम दे ब्रॉट वॉरियर डेड’ अशा गाजलेल्या कवितांचा उल्लेख सहस्त्रबुद्धे यांनी या व्याख्यानात केला.
टेनिसन हे कवितांबरोबर त्यांच्या लिखित वचनांसाठी प्रसिद्ध होते. कवितेतही त्यांनी सर्वनामांचा चांगला उपयोग केला, असेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी या व्याख्यानात सांगितले.
प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी रसिक मित्र मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.