विद्यार्थ्यांना जलसंवर्धन क्षेत्रातील करीयर संधीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीचा रोटरीचा उपक्रम स्तुत्य : प्रमोद चौधरी (अध्यक्ष प्राज इंडस्ट्रीज )
पुणे :‘रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’, ‘जाणीव युवा’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने ‘वॉटर आलिंपियाड स्पर्धा’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलिंपियाड प्रकल्पाचे उद्घाटन ‘प्राज इंडस्ट्रीज’ चे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते नुकतेच झाले.
ही स्पर्धा २० मार्च २०१८ ला होणार असून, दिनांक ३१ जानेवारी २०१८ पर्यंत नावनोंदणी करायचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) होते. यावेळी ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड’ चे अध्यक्ष अशोक भंडारी, सतीश खाडे (रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे प्रकल्पाचे मुख्य सम्नवयक आणि प्रकल्प अध्यक्ष) उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमधील ‘पर्यावरण शास्त्र विभाग’ येथे हा कार्यक्रम झाला. रोटरीच्या या उपक्रमाचे ‘प्रोटॉन जल’ हे मुख्य प्रायोजक आहेत.
विद्यार्थ्यांना जलसंवर्धन क्षेत्रातील करीयर संधीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीचा रोटरीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे उद्गार अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज प्रमोद चौधरी यांनी काढले.
‘पाणी संकट संबंधित मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि येत्या दशकामध्ये या मुद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पाणी संकट आणि पाणीटंचाई विषयी तंत्रज्ञान आणि जनजागृती काही प्रमाणात दिलासा देऊ शकतात. म्हणूनच नवोदित तंत्रज्ञांनी या विषयावर नाविन्यपूर्ण आणि कृती करण्यासाठी युवकांना संधी देणे आवश्यक आहे, त्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, संकल्पना सूचना, पोस्टर स्पर्धा आणि लघुपट स्पर्धा यांचा समावेश आहे सर्व क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात,’ अशी माहिती रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे प्रकल्प अध्यक्ष सतीश खाडे यांनी दिली.
या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोटरीच्या वतीने विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. ती पुढीलप्रमाणे :
1. शिष्यवृत्तीचे वाटप. यामध्ये मिळणार्या शिष्यवृत्तीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कोणत्याही संस्थेत पाणी संकट विषयातून एम एस करता येऊ शकेल. या शिष्यवृत्तीची मर्यादा साडे चौतीस हजार पाऊंड इतकी असेल.
2. बाविस देशांमधून एका देशामध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी संधी. यामध्ये विद्यार्थ्याला जाण्या-येण्याचा आणि तेथील राहण्याचा खर्च रोटरीच्या वतीने करण्यात येणार असून, विद्यार्थ्याच्या इंटर्नशिपचा देखील खर्च करण्यात येणार आहे.
3. ‘सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन’ (सीडब्ल्यूपीआरएस) सारख्या संस्थांमध्ये किंवा पाणी विषयावर विविध तंत्रज्ञान विकसित करणार्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच पाणी विषयक प्रशिक्षण करणार्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेता येण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
4. ‘किसान एक्स्पो’ सारख्या प्रदर्शनामध्ये प्रकल्प मांडता येण्याची संधी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना पाणी समस्या आणि पाणी टंचाईबाबत संवेदनशील करणे आवश्यक आहे. जलसंवर्धन, पाणी जतन, पाणी पुनर्वापराचे आधुनिक तंत्रज्ञानात्मक उपाय मिळवण्याचे मार्ग त्यांनी शोधणे गरजेचे आहे. उद्योगसंस्था आणि प्रशिक्षण संस्था यांची या कामात मदत घेता येऊ शकेल हे विद्यार्थ्यांना या ऑलिंपियाडच्या माध्यमातून समजावे हा उद्देश आहे. ज्यामुळे समाजाला याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल.