सलग 18 व्या वर्षी पुणेकर रसिकांना मिळणार कवितांची पर्वणी
पुणे : कवींनी कवींसाठी आयोजित कविता प्रेमिकांचा वार्षिक आनंदोत्सव ‘काव्य सप्ताह-2017’ दिनांक 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत भारत स्काऊट अॅण्ड ग्राउंड सभागृह, उद्यान प्रसाद कार्यालयसमोर, सदाशिव पेठ, पुणे -30 येथे सायंकाळी 7 वाजता साजरा होईल, अशी माहिती आयोजक रमेश गोविंद वैद्य यांनी दिली.
यावेळी ‘रसिक मित्र मंडळा’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला आणि ‘प्रबोधन माध्यम न्यूज एजन्सी’चे संस्थापक दीपक बीडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या काव्यसप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवाला विश्वास वैद्य यांच्या चित्रप्रदर्शनाची जोड देण्यात आलेली आहे. या काव्य सप्ताह 2017 चे उद्घाटन ‘प्रबोधन माध्यम न्यूज एजन्सी’चे संस्थापक दीपक बीडकर यांच्या हस्ते होणार आहे, तर विश्वास वैद्य यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ‘रसिक मित्र मंडळा’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते होईल.
मराठीमधील ज्येष्ठ कवी रमेश गोंविंद वैद्य हे दरवर्षी काव्यसप्ताह’ साजरा करतात. कवितावाचनाचे कार्यक्रम जनमानसात अधिक रुजावेत, नवोदितांना उत्तेजन मिळावे या उद्देशाने कवी रमेश वैद्य यांनी सुरू केलेला ‘काव्यसप्ताह’ हा उपक्रम पुणेकरांना सुपरिचित झाला आहे. यंदा हा उपक्रम 18 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
या काव्यसप्ताहातंर्गत 25 डिसेंबर रोजी ः‘कोवळ्या उन्हात…मोकळ्या रानात’ (कविसंमेलन), 26 डिसेंबर रोजी ः‘ रु रु रुबायांचा’ – सादरकर्ते – गीतांजली जोशी, दीपाली दातार, आश्लेषा महाजन, सुधीर कुबेर, वसंत गोखले, नचिकेत जोग, सतीश काळे. 27 डिसेंबर रोजी ः ‘ठोसबोध आणि खवचटिका’ (अरुण काकतकर काव्याधारित) सादरकर्ते – अरुण काकतकर, सुरेश भागवत, मिताली लिमये, स्वाती दामले, अरुण काकतकर. 28 डिसेंबर रोजी ः ‘ओंजळ…अर्धी…भरलेली! सादरकर्ते – अभिजित कर्वे, मंजिरी धामणकर. 29 डिसेंबर रोजी ः ‘दायभाग’ (माधव हुंडेकर काव्याधारित). सादरकर्ते माधव हुंडेकर, आश्लेषा महाजन. 30 डिसेंबर रोजीः ‘गप्पा आणि गिरसप्पा’ (रमेश वाकनीस यांची मुलाखत व त्यांचे कवितावाचन) (संवादक ः सुनेत्रा नकाते, सुहास घुमरे, सुरेश कोकीळ, रमेश वैद्य). 31 डिसेंबर रोजी ः चंद्र उतरे मनात ! (कविसंमेलन). आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘काव्यसप्ताह’ आणि कवी रमेश गोविंद वैद्य हे एक अजोड नाते आहे. पुण्यात सातत्याने 16 वर्षे या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पंधरावा काव्यसप्ताह (2014 चा) मुंबईत दादरमध्ये घ्यावा, असे वैद्यांच्या मनात आले. ही कल्पना त्यांनी काही प्रस्थापित व नवोदित कवी-कवयित्रींना बोलून दाखवताच त्यांनी ती उचलून धरली. हे स्वप्न साकार करायचेच या जिद्दीने वैद्यांनी मार्च 2014 पासूनच पाऊले टाकण्यास सुरुवात केली. पुण्यातील काव्यप्रतिभेचे दर्शन मुंबईकरांना घडवण्यासाठी गतवर्षीचा काव्यसप्ताह मुंबईमध्ये चक्क दादरमध्ये घेण्याचे यशस्वी साहस वैद्यांनी करून दाखविले.
सलग सात दिवस काव्यासंबंधी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे, नव्या-जुन्या कवींना कार्यक्रमात संतुलित स्थान देणे, सगळ्या लहान-मोठ्या तपशीलांकडे लक्ष पुरवित काव्य मैफलींचे नियोजन करणे आणि हे सर्व स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता करणे हे रमेश गोविंद वैद्यांचे वैशिष्टये आहे.


