वसंत अमराळे मित्र परिवारातर्फे ३०० विधवांचा सन्मान
पुणे
आज विविध क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत ;पण रूढी परंपरेचा विळखा अजून काही सुटलेला नाही. जन्म न घेऊ देता मुलीच्या उज्ज्वल भविष्याची शक्यता मारून टाकण्याची अपप्रवृत्ती आजही आहे .त्यामुळे रूढी परंपरेला छेद देत स्त्री जन्माचे स्वागत व्हावे अशी अपेक्षाअक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.
वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवारातर्फे पती विरहाचे दुःख बाजूला सारून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या ३०० महिलांचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते स्वयंसिद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला त्याप्रसंगी फडणवीस बोलत होत्या. यावेळी नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, सामाजिक समरसता परिषदेच्या डॉ. श्यामा घोणसे ,पालकमंत्री बापट यांच्या स्नुषा व सांगलीच्या नगरसेविका स्वरदा बापट,नगरसेवक दिलीप वेडेपाटील , संयोजक वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे, स्मिता अमराळे आदी उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या कि, अकाली आलेल्या वैधव्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाणाऱ्या या महिलांचा माझ्या हस्ते सन्मान होत आहे,त्या एकप्रकारे हिरकणीच आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे वृत्त कळताच काही क्षण मला असे वाटले ,सारे काही संपले मात्र आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने देवेन्द्र फडणवीस बचावले. पती निधनानंतर तुम्ही संपूर्ण घरासाठी खंबीर उभ्या राहिल्या याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे.पूर्वी खूप चुकीच्या प्रथा होत्या परिणामी स्त्रियांना अनेक यातना भोगाव्या लागल्या मात्र आज वातावरण बदलले आहे. अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत पण रूढी -परंपंरा अजूनही आहे. स्त्री नको हा एकप्रकारे अत्याचारच आहे. उलट स्त्री जन्माचे स्वागत ही प्रवृत्ती वाढीस लागली पाहिजे. स्त्री असल्याचा मला अभिमान आहे.मुलगी ही देशाचीच नव्हे तर विश्वाचे भवितव्य आहे. त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत होण्याची विचारधारा रुजणे ही काळाची गरज आहे. प्रास्ताविकात संयोजक वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे यांनी कोणत्याही संकटाना पुरुषांपेक्षा स्त्री सक्षमपणे सामोरी जाते. आज महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र रूढी – परंपरेच्या विळख्यात मात्र समाज अजूनही बुरसटलेल्या विचारधारेत अडकून पडला आहे. पती विरहाचे दुःख बाजूला सारून घरासाठी सक्षम बनलेल्या स्त्रियांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रूढी -परंपरेला कायमचे हद्दपार करण्यासाठी समाजात सकारात्मक मानसिकता निर्माण व्हावी हा उद्देश यामागे आहे,असे ते म्हणाले. यावेळी पांडुरंग साठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.