एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेतेपदी निवड
मुंबई – शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेतेपदी निवड करण्यात आली. तर सुनील प्रभू यांना शिवसेनेचे पक्षप्रतोद घोषित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी गटनेते पदासाठी एकनाथ शिंदे यांची शिफारस केली होती. या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या दिवशी केलेल्या वक्तव्याबाबत आक्षेप घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार, समर्थक प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक गुरुवारी शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता पार पडली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ नेत्याची निवड करून घोषणा करण्यात आली.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. तर आमदार दादा भुसे यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देत सुनील प्रभू यांना विधानसभेत शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून निवडण्यात आले.
‘यापूर्वी शिवसेनेबाबत कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेशी काही बोलणे झाले नसल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्री केलेल्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ते विधान योग्य नसल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर आपण मित्रपक्षाला शत्रुपक्ष मानत नाही. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी अमित शाह आणि आमच्यात जे ठरले होते तेच होईल, आम्ही स्थिर सरकार देऊ असे उद्धव म्हणाले. दरम्यान भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचे उद्धव यांनी यावेळी सांगितले.