पुणे-उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,महाराष्ट्रात ज्या दोन ठिकाणी दंगली झाल्या, त्याठिकाणी आता पूर्णपणे शांतता आहे. पोलिस पूर्णपणे सक्रिय आहेत.
राज्यात काही लोक जाणून बुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवून देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार असा गंभीर इशारा दंगली घडवणाऱ्याना त्यांनी दिला. काहीजण राज्यात मुद्दाम राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते सफल होणार नाहीत, जे अशा प्रकारे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आम्ही सोडणार नाही.
विधानसभेतील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचे सोपवले आहे.याबाबत विधानसभा अध्यक्ष यांनी लवकर निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले आहे याबाबत फडणवीस म्हणाले,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गेल्या कित्येक वर्षापासून कायद्याची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे ते हे कोणतही बेकायदेशीर काम करणार नाही, कुणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ते दबावाला बळी पडणार नाहीत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला पिंपरीत दाखवले काळे झेंडे; छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला घेतले ताब्यात–गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड शहरात दौऱ्यावर असताना पिंपरी येथे त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी छावा संघटनेचे शहर उपाध्यक्ष गणेश भांडवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.