नागपूर – कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारच येणार असल्याचे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेतीसंद्र्भात बोलताना म्हटले आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची शुक्रवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. आता या भेटीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जरी अजित पवारांनी नाकारले तरी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट ही राजकीय असल्याची चर्चा झाली. भाजप विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ही बैठक झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल यात शंका नाही असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले….
अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी स्वतः मी यापुढे रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले आहे. यासोबतच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात. आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामे असू शकतात. पण त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कोणतेही कारण नाही. यासोबतच केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक म्हणाले की…
प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.